मुंबई :- समाज कितीही पुढारला व शिकला तरी लग्नसंस्कारांबाबत पारंपरिक विचारसरणी दूर होत नाही. आज समाजात प्रेमविवाहांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे, त्याच वेळी जातीबाहेर लग्न केलं म्हणून मुलीला किंवा मुलाला मारल्याचे गंभीर प्रकारही वाढत आहेत.उत्तर प्रदेशात हरदोईमध्ये अशीच एक घटना घडली. कुटुंबाच्या विरोधात जाऊन जातीबाहेरच्या एका मुलावर प्रेम करत असल्यानं सख्ख्या बहिणीला भावांनी जाळून मारलं. लखनौच्या काकोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कायस्थाना भागात राहणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता.
त्याबाबत तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. जातीबाहेर लग्न केल्यानं सख्ख्या भावांनीच बहिणीला मारलं.त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार, त्यांची बहीण बिट्टी उर्फ संगीता जातीबाहेरच्या एका मुलावर प्रेम करत होती. कुटुंबाला ती गोष्ट माहीत होती; पण त्यांचा त्याला विरोध होता. अनेक वेळा नकार देऊनही तिनं ऐकलं नाही. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी मावशीची तब्येत ठीक नसल्याचं खोटं सांगून तिला कारमधून अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भागात नेलं. पवैया गावापासून गहडोलला जाणाऱ्या रस्त्यावर निर्मनुष्य भागात गाडी थांबवून तिचा गळा दाबून तिला मारलं. नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं.
अप्पर पोलीस अधीक्षक (पूर्व) नृपेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं, की सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यात तरुणीचे भाऊ दुर्गैश सैनी आणि शंकर उर्फ रवी यांच्याबद्दल संशय वाटल्यानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आरोप कबूल केले. मग पोलिसांनी त्यांना अटक केली. ज्या कारमधून त्यांनी तिला आणलं ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे.एएसपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा तिथे एक कार आल्याचं त्यांना समजलं. त्या कारमध्ये दोन जण होते.
आजूबाजूच्या व्यक्तींनी कारमधल्या दोन व्यक्तींबाबत माहिती पुरवली. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं, तेव्हा एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपींचे चेहरे दिसले. त्याआधारे पोलीस आरोपींच्या लखनौमधल्या घरी गेले व त्यांना ताब्यात घेतलं.बहिणीचं जातीबाहेरच्या मुलावर प्रेम असल्यामुळे सख्ख्या भावांना तिला मारावंसं वाटलं, यावरून समाजात जातीविषयक तेढ किती आहे हे लक्षात येतं. समाजात असे अनेक प्रकार घडतात. शिक्षण व कायदे कठोर करूनही समाज अजून त्यातून बाहेर पडताना दिसत नाही.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४