एका बहाद्दरने केलीत पाच महिलांशी लग्न, विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर ४९ महिलांशी लग्नाची बोलणी सुरू,पैसे लुबाडून दुबईत करायचा मौज.

Spread the love

भुवनेश्वर :- मराठी रंगभूमीवर आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकर यांच्या अभिनयाने अजरामर झालेले ‘तो मी नव्हेच’ हे नाटक जुन्या पिढीतील अनेकांना ठाऊक आहे. या नाटकातील लखोबा लोखंडे नामक आरोपी विविध सोंग करून आपल्यावरचे आरोप फेटाळून लावत असतो.ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये अशाच एका लखोबा लोखंडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या ३४ वर्षीय आरोपीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून एकाच वेळी पाच महिलांशी लग्नगाठ बांधळी. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपयेही उकळले. कहर म्हणजे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर कळले की, आरोपी विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर आणखी ४९ महिलांशी लग्नाची बोलणी करत होता.

आरोपीचे नाव सत्यजीत सामल असल्याचे सांगितले जाते. सत्यजीत लग्न केलेल्या पाच पत्नीपैकी दोघींनी केलेल्या वेगवेगळ्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांना घेऊन सत्यजीतसाठी सापळा रचला. भुवनेश्वर-कटक पोलीस आयुक्त संजीब पांडा यांनी सांगितले की, महिला अधिकाऱ्याचा प्रोफाइल तयार करण्यात आला होता. त्यावरून सत्यजीत लग्नाची बोलणी करण्यासाठी आला असता त्याला अटक करण्यात आली.पोलिसांनी आरोपी सत्यजीतकडून मोटारसायकल, २.१० लाखांची रोकड, पिस्तुल, काडतुसे आणि लग्नासंबंधी काही कागदपत्रे जप्त केली. चौकशीदरम्यान तक्रार केलेल्या दोन महिलांशी आपण लग्न केल्याचे सत्यजीतने कबूल केले. त्याच्या पाच पत्नींपैकी दोन ओडिशा, एक कोलकाता आणि एक दिल्लीची आहे. पाचव्या पत्नीची माहिती शोधली जात आहे. पोलिसांनी सत्यजीतची तीन बँक खाती गोठवली आहेत.

आरोपी गुन्हा कसा करायचा?

आरोपी सत्यजीत हा मुळचा ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील आहे. सध्या तो भुवनेश्वरमध्ये राहतो. मॅट्रिमोनियल साइटवरून तो विधवा आणि घटस्फोटीत महिलांना आपले सावज बनवायचा. लग्न जुळल्यानंतर तो मुलीच्या घरच्यांकडून गाडी आणि रोख रकमेची मागणी करायचा. लग्नानंतर जर पैसे परत मागितले तर पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना गप्प करत असे. फेब्रुवारी महिन्यात एका महिलेने पुढे येऊन तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. वधू-वर सूचक संकेतस्थळावरून या महिलेची आरोपी सत्यजीतशी ओळख झाली होती.

लग्नाचे वचन देऊन आरोपीने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पैसे आणि गाडी घेऊन देण्याची मागणी करू लागला. या महिलेने वैयक्तिक कर्ज काढून ८.१५ लाख रुपयांची गाडी घेऊन दिली. तसेच आरोपीच्या मागणीनुसार व्यवसाय सुरू करून देण्यासाठी ३६ लाख रुपये दिले.आणखी एका तक्रारीनुसार दुसऱ्या महिलेने सत्यजीतला ८.६० लाख रुपये दिले. तसेच दुचाकी घेऊन दिली. या महिलेनेही विविध बँकांमधून वैयक्तिक कर्ज घेऊन आरोपी सत्यजीतच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या.पोलीस आयुक्त पांडा यांनी सांगितले की, सत्यजीतला चैनीचे आयुष्य जगण्याची सवय होती. महिलांकडून पैसे लुबाडल्यानंतर तो दुबईला पळून जात असे आणि जेव्हा त्याला दुसरे सावज मिळे, तेव्हाच तो परत येत असे. अखेर सत्यजीतला अटक केल्यानंतर आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार