‘आई’ आमच्यासाठी सर्वकाही तिच्या शिवाय आमचे अस्तित्‍व नाही,चिठ्ठी लिहून हाता-पायाला दोरी बांधून उच्चशिक्षित बहीण-भावाने संपवलं जीवन

Spread the love

आईच्या निधनामुळे मानसिक धक्कात होते दोघे, मृत्यपूर्वी 25 लाख केले दान.

आम्ही आईसाठीच जगत होतो. आई आमच्यासाठी सर्वकाही होती. तिच्याशिवाय आमचे अस्तित्‍व नाही. आता आम्ही राहू शकत नाही… अशी चिठ्ठी या बहीणभावाने लिहून ठेवली होती.

कोल्हापूर : आईच्या निधनाचा मानसिक धक्का बसलेल्या सख्‍ख्या बहीण-भावाने राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या केली.त्यांचे मृतदेह गुरुवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास पाण्यावर तरंगताना मिळून आले. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१) व ॲड. भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (५७, दोघे रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत.मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून आईचा विरह सहन न झाल्याचे कारण समोर आले.

या दोघा उच्चशिक्षितांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नाळे कॉलनीत राहणारे भूषण कुलकर्णी कस्टम अधिकारी म्हणून तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. भाग्यश्री यांनी यापूर्वी गोखले महाविद्यालय व राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे. त्या सात वर्षांपासून वकिली करीत होत्या. दोघेही त्यांची आई पद्मजा कुलकर्णी यांची सेवा करीत होते. आईच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या लग्नाचाही विचार केला नव्हता, असे नातेवाईक सांगत होते.

घरी केवळ दोघांचे कपडेच…

गेल्या दोन महिन्यांत कुलकर्णी यांनी घरातील अनेक वस्तू गरजूंना दिल्या. त्यांच्याकडे वापरातील कपड्यांचे काही जोडच शिल्लक उरले होते. बहीण-भावाने मागील दोन महिन्यांत इच्छापत्रातून सर्व काही दान केल्याचे समोर आले आहे.

आई सर्वकाही

आम्ही आईसाठीच जगत होतो. आई आमच्यासाठी सर्वकाही होती. तिच्याशिवाय आमचे अस्तित्‍व नाही. आता आम्ही राहू शकत नाही… अशी चिठ्ठी या बहीणभावाने लिहून ठेवली होती. नाळे कॉलनी येथील घर, पन्हाळा तालुक्यातील कोते येथील शेतजमीन याचा उल्लेख पुण्यातील दि महाराष्ट्र एक्झिक्युटर ॲन्ड ट्रस्टी कंपनी प्रा. लि. यांच्याकडे दिलेल्या इच्छापत्रात असण्याची शक्यता आहे. ते इच्छापत्र काही दिवसांनी उघडण्यात येणार आहे. भाग्यश्री यांनी बी. एस्सी., एलएल. बी, एम. ए., एम. फिल, पीएच.डी नेट (मराठी), एम. ए. (हिंदी), एम. लिब ॲन्ड इन्फॉ. सायन्स, बी.जे.सी. (पत्रकारिता), जी.डी.सी. ॲन्ड ए., डीएलएल व एडीआर अशा पदव्या प्राप्त केल्या होत्या.

संस्कृत धर्मकोशासाठी २५ लाखांची देणगी….

पद्मजा कुलकर्णी यांनीही इतिहास विषयातून एम. ए. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व्होकल म्युझिकमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. पाककला, संस्कृत, ज्योतिषशास्त्रात त्यांना रुची होती. संस्कृतमध्ये त्यांची ही आवड लक्षात असल्याने वाई (जि. सातारा) येथील प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या ”धर्मकोश” प्रकल्पाला मदत देण्याची इच्छा त्यांनी मुलांजवळ व्यक्त केली होती. पद्मजा कुलकर्णी यांच्या निधनानंतर भूषण व भाग्यश्री कुलकर्णी यांनी नुकतीच २५ लाखांची देणगी या पदाधिकाऱ्यांनी देऊ केली होती.

अनाथ मुले, संस्थांना सढळ हाताने मदत…

कुलकर्णी बहीण-भावाने नागपूर, सोलापूर, मुंबई, पुणे येथील अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था, पाळणा घरांसाठी, बांधकामांसाठी आर्थिक पाठबळ दिले. आई पद्मजा कुलकर्णी यांच्या नावाने ते ही मदत करीत होते. तसेच त्यांच्या मृत्यूनंतरही वाई (जि. सातारा) येथील प्राज्ञ पाठशाळेला संस्कृत धर्मकोश निर्मितीसाठी २५ लाखांची देणगी नुकतीच दिली होती.

हाता-पायाला दोरी बांधून उडी

राजाराम तलावावर जनावरे चारण्यासाठी आलेल्या स्थानिकांना गुरुवारी सकाळी दोन मृतदेह तरंगताना दिसले. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काठावर मिळालेल्या बॅगेतील कागदपत्रांवरून दोघांची ओळख पटविण्यात आली. त्यांच्या आत्येभावाला बोलावून खातरजमा करण्यात आली. दोघांनीही एकमेकांच्या हातांना दोरी बांधून घेऊन उडी मारल्याचे समोर आले आहे.

आईच्या निधनाचा धक्का

पद्मजा ऊर्फ कुसूम कुलकर्णी (वय ८४) यांचे २४ मे २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी दोघेही त्यांच्याजवळ होते. आईच्या निधनाचा दोघांनाही मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यांनी अनेक दिवस अन्नत्याग केल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. आईच्या निधनानंतर त्यांनी अनेक संस्थांशी संपर्क केला होता.पूर्वीपासूनच आदिवासी मुले, वीटभट्टीवरील मुले, अनाथ आश्रमांना दोघांनी सढळ हाताने मदत केली आहे. आईच्या नावानेही त्यांनी मागील दोन महिन्यांत संस्थांना मदत केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार