एरंडोल :- पोळ्याचा बाजार करून घराकडे जात असणा-या जळके (ता.जळगाव) येथील युवकांच्या मोटारसायकलला भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सतरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला.हा अपघात आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वावडदा नेरी मार्गावर झाला. दरम्यान धडक देवून भरधाव वेगाने पळून जाणा-या ट्रकचालक व त्याच्या सहका-यास एरंडोल पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने शासकीय वाहन तसेच मोटारसायकली रस्त्यावर उभ्या करून धरणगाव
चाफुली येथे ग्रामस्थांच्या मदतीने ताब्यात घेतले.
यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकास ताब्यात देण्याची मागणी केल्यामुळे परिसरात तणाव
निर्माण झाला होता.पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ट्रकचालक व त्याच्या सहका-यास सुरक्षितपणे पोलीसस्थानकात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.संतप्त नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत ट्रकचे नुकसान झाले तर भरधाव वेगाने जाणारा ट्रक थांबवण्याच्या प्रयत्नात दीपक पाटील हे पोलीस
कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
याबाबत माहिती अशी,की जळके येथील पवन गोपाल सूर्यवंशी (वय-१७) त्याचा सहकारी अलताफ बंडू तडवी (वय-१९) हे मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ बी.व्ही. ७५३१ ने वावडदा येथे पोळ्याचा सण असल्यामुळे बैलांचा साज खरेदी करण्यासाठी आले होते.बैलाच्या साजसह अन्य साहित्याची खरेदी केल्यानंतर दोन्ही जण जळके येथे जात होते.साडेनऊ वाजेच्या सुमारास नेरीकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्रमांक एच.आर.७३-९३१६ ने मोटरसायकलला समोरून
जोरदार धडक दिल्यामुळे मागे बसलेला पवन गोपाल सूर्यवंशी याच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अत्र अलताफ तडवी हा गंभीर जखमी
झाला.
मोटरसायकलला धडक दिल्यानंतर ट्रकचालक आर्शीद सत्तार खान व सहचालक शब्बीर हजरत खान यांनी ट्रक वेगाने चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.अपघाताची माहिती मिळताच जळगाव येथील औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकातील कर्मचा-यांनी एरंडोल पोलीस स्टेशनशी संपर्क साधून अपघातग्रस्त ट्रकचालक ट्रकसह एरंडोलकडे येत असल्याचे कळवले.दरम्यान मोटरसायकलला धडक दिल्यांनतर ट्रकचालक ट्रकसह एरंडोलकडे गेल्याचे समजताच जळके,वावडदा,म्हसावद येथील शेकडो ग्रामस्थांनी मोटारसायकलींवरून ट्रकचा
पाठलाग सुरु केला होता.
एरंडोल पोलीस स्टेशनचे कर्मचारी कपिल पाटील,दीपक पाटील, शिवाजी पाटील दत्ता ठाकरे यांचेसह कर्मचा-यांनी पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर शासकीय वाहन, मोटारसायकली लाऊन रस्त्याची नाकाबंदी केली. म्हसावदकडून भरधाव वेगाने येत असलेल्या अपघातग्रस्त ट्रकचा चालक आर्शीद सत्तर खान याने
पोलिसांनी केलेली नाकाबंदी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी पोलीस कर्मचारी कपिल पाटील हे ट्रकला लटकले तर दीपक पाटील यांनी शासकीय
वाहनाने ट्रकचा पाठलाग करून धरणगाव चौफुली येथील उड्डाणपुलाजवळ ट्रकच्या पुढे शासकीय वाहन उभे करून ट्रकचालक व सहचालकास ताब्यात घेतले.
यावेळी सुमारे चारशे ते पाचशे नागरिकांचा जमाव पोलीस स्थानकासमोर जमा झाला होता.संतप्त झालेल्या जमावाने ट्रकचालकास ताब्यात देण्याची मागणी
केल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. एरंडोल पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिल पाटील, शिवाजी पाटील,मिलिंद कुमावत,कपिल पाटील,दीपक
पाटील,दत्ता ठाकरे संदीप पाटील यांचेसह गृहरक्षकदलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून संतप्त जमावाला शांत करून ट्रकचालक व त्याच्या
सहका-यास सुरक्षितपणे पोलीसस्थानकात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
जळगाव आयोगिक वसाहत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र उगले,हवालदार स्वप्निल पाटील व त्यांच्या सहका-यांनी एरंडोल येथे येवून ट्रकचालक व त्याचा सहका-यास ताब्यात घेतले.ट्रकचालक व त्याचा सहकारी संताप जमावाच्या तावडीत सापडले असते तर मोठी दुर्घटना होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा
राहिला असता,मात्र एरंडोल पोलिसांनी प्रसंगावधान राखत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असतांना घेतलेल्या संयमी भूमिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.दरम्यान अपघातात मयत झालेला पवनसूर्यवंशी तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ असून त्याचे पच्छात आई,वडील,बहिणी असा परिवार आहे.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४