धार्मिक :- आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचे आगमन होते, तेव्हा तर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.यंदाचा गणेश चतुर्थीचा सण उद्या (शनिवार ७ सप्टेंबर) पासून सुरु होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्सवाची तुफान तयारी सुरू आहे.१० दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा आणि आराधना केली जाते. तर जाणून घेऊयात गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आणि कुठल्या मंत्रांचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतील…..
गणपतीची पूजा आणि स्थापनेची शुभ वेळ …….
शनिवार ७ सप्टेंबर रोजी, गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी ८ ते ९.३०, दुपारी ११.२० ते १. ४०, संध्याकाळी २ ते ५.३० अशी स्थापनेची शुभ वेळ असणार आहे. तर यावर्षी अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर २०२४ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो.
गणरायाची पूजा करताना “ओम गं गणपतये नम:” या मंत्राचा जप करत गणेशाला पाणी, फुले, अक्षदा, चंदन आणि धूप-दीप तसेच फळ नैवेद्य अर्पण करा. गणेशाला त्यांचे सर्वात प्रिय मोदक प्रसाद म्हणून अर्पण करा आणि यंदा गणेश उत्सवाचा आनंदाने लाभ घ्या.
प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी….
१. गणपती बाप्पाला विराजमान केल्यावर चौरंगावर किंवा पाटावर ठेवण्यासाठी वस्त्र, तर दाराबाहेर काढण्यासाठी रांगोळी.
२. पूजेसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे निरांजन, उदबत्ती, समई, धूप, कापूर, वाती, आरतीचे ताट.
३. पाच फळे, सुपारी, नारळ, विड्याची पाने, सुक्या खोबऱ्याची वाटी व त्यात ठेवायला गूळ, सुट्टे पैसे.
४. पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी कलश, पाणी व आंब्याची पाने.
५. निवडलेल्या दुर्वांची २१-२१ ची जुडी.
६. गणपतीची मूर्ती सजवण्यासाठी व बाप्पाला आवडतात म्हणून लाल जास्वंदाची फुले, सुगंधित फुले, दुर्वा.
७. पूजेदरम्यान श्लोक म्हणण्यासाठी अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, आरतीचे पुस्तक.
८. मूर्तीला अर्पण करण्यासाठी जानवे, कार्पासवस्त्र (कापसाचे व्रस्त्र) आणि पूजेसाठी दोन ताम्हण, तीन पोफळे.९. अभिषेक करण्यासाठी पंचामृत, सुगंधित जल, शुद्ध पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता.१०. गणेशाला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत.
गणेश चतुर्थी पूजा विधी
घरच्या घरी पूजा करत असाल तर, ती कशी करायची त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर बाप्पाची स्थापना घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात करावी. हे लक्षात ठेवा ऊं गं गणपतये नम: मंत्रोच्चार करत पूजा करावी. बाप्पाच्या पूर्व दिशेला कळस ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा ठेवा. आता स्वतःवर पाणी शिंपडताना ॐ पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर बाप्पाला नमस्कार करून 3 वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा. आता बाप्पावर प्रथम पाणी आणि नंतर पंचामृताचे काही थेंब टाका. आता शुद्ध पाणी शिंपडा. धातूची मूर्ती असल्यास त्याचाही अभिषेक करा. आता दिवाची पूजा करुन दिपप्रज्वलन करा.आता बाप्पाला जास्वंदाचं फुल, दुर्वा, जाणवं, पान सुपारी अर्पण करा. यानंतर वस्त्र, चंदन, अक्षदा, धूप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. धूप लावा. आता ऋतुफळ, सुकामेवा, मोदक किंवा इतर मिठाईचा नैवेद्य दाखवा. आता गणेशाची आरती करा, मंत्रपुष्पांजली आणि कपूर आरती करा.
गणपतीची आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४