आयजींच्या पथकाची एरंडोलला पत्त्याच्या क्लबवर धाड.आठ जणांविरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

पथकातील कर्मचा-यांनी सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांची रोकड गायब केल्याच्या क्लब मालकाच्या आरोप.

एरंडोल :- येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मयुरी गार्डन जवळ सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर नासिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने धाड टाकून सुमारे १ लाख ३१ हजार १४० रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. याबाबत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान शहरात सहा पत्त्यांचे क्लब बिनधास्तपणे सुरु असतांना केवळ एका क्लबवर कारवाई करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान पत्त्यांच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पथकातील कर्मचा-यांनी सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांची रोकड गायब केल्याचा आरोप क्ल्बचालकांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला आहे.

पत्त्यांच्या क्लबवर धाड पडल्यानंतर क्लबचालकानी पोलीस प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले.याबाबत माहिती अशी,की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हॉटेल मयुरी गार्डन येथे पत्त्यांचा क्लब सुरु असल्याची गुप्त माहिती नासिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयास प्राप्त झाली होती.पत्त्यांच्या क्लबबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकप्रमुख उपनिरीक्षक अरुण भिसे यांचेसह हवालदार प्रमोद मंडलिक,सुरेश टोंगारे,विजय बिलघे,तुषार पाटील,विक्रांत मांगडे,स्वप्निल माळी यांनी पारोळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार,हवालदार हिरालाल पाटील,अभिजित पाटील,अनिल राठोड, आकाश माळी यांच्या मदतीने काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास क्लबवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.

पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख ३१ हजार १४० रुपये रोह रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त केले.पोलीस पथकाने धाड टाकताच अन्य काही जण भिंतीवरून उड्या मारून फरार झाले.याबाबत हवालदार प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्लबचालक नितीन चैत्राम चौधरी,विकास प्रेमराज महाजन,चंद्रकांत सतीलाल वाघ,गणेश बाबुलाल चौधरी,दीपक प्रभू लोहिरे,धनराज अशोक पाटील,संदीप भानुदास जाधव, सतीश चैत्राम चौधरी,चंदन रमेश जैस्वाल यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पोलीस पथकाने पत्त्यांच्या क्लबवर धाड टाकताच क्लबचालक आणि पथकातील कर्मचा-यांमध्ये वाद सुरु झाला होता.

पथकातील कर्मचा-यांनी क्लबमध्ये धाड टाकल्यानंतर
सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांची रोकड बोलेरो गाडीतून गायब केल्याचा आरोप करण्यात आला. आमच्या विरोधात कारवाई करा,मात्र जप्त करण्यात आलेल्या सर्व रोख रकमेचा पंचनाम्यात उल्लेख करण्यात यावा अशी मागणी यावेळी संशयितांनी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.शहरात सात ते आठ ठिकाणी पत्त्यांचे क्लब सुरु आहेत,सट्ट्याचे क्लब सुरु असतांना केवळ आमच्या क्लबवरच कारवाई का करण्यात आली असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला तसेच क्लब चालवण्यासाठी कोणाला किती रक्कम देण्यात येते याची माहितीच यावेळी दिली.

दरम्यान क्लबवर धाड टाकत असतांना एक डॉक्टर परिवारासह सुरत येथे जात असतांना हॉटेल मयुरी गार्डन येथे भोजनासाठी येत असतांना पोलिसांनी त्यांच्याकडील पन्नास हजार रुपये रोख व मोबाईल ताब्यात घेतला.सदर डॉक्टर पथकातील कर्मचा-यांच्या विनवण्या करून माझा काहीही संबंध नाही असे सांगत होते,मात्र कर्मचा-यांनी त्यांचे काहीही एकूण घेतले
नाही रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांना केवळ मोबाईल परत करण्यात आला.तसेच एका चहा विक्रेत्याचे देखील सुमारे चार हजार रुपये काढून
घेतल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.क्लबवर धाड पडताच त्याठिकाणी मोठा जमाव जमा झाला होता.

पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक शंकर पवार,उपनिरीक्षक शरद बागल,विकास देशमुख,विलास पाटील,काशिनाथ पाटील,संतोष चौधरी,दीपक पाटील, दीपक अहिरे,पंकज पाटील यांनी जमावास पांगवले. दरम्यान शहरात सहा पत्त्यांचे क्लब आणि एक सट्ट्याचा क्लब बिनधास्तपणे सुरु असून स्थानिक पोलिसांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद करण्याएवजी त्यांना प्रोत्साहन देत असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.पत्त्यांच्या
क्लबवर धाड पडताच आज शहरातील अन्य क्लब बंद होते तर सट्ट्याचा क्लब मात्र बिनधास्तपणे सुरु होता.

हे पण वाचा

टीम झुंजार