मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा पंधरावा सामना लखनौने ६ गडी राखून सफाईदारपणे जिंकला. लखनौ सुपर जायंटसने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळाची सुरूवात करायला पॄथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर उतरले. जेसन होल्डरच्या पहिल्या षटकात केवळ ४ धावा निघाल्या. कृष्णाप्पा गौथमच्या दुसर्या षटकात पॄथ्वी शॉने दोन सनसनीत चौकार मारले. वॉर्नरने एक धाव घेत पॄथ्वी शॉकडे फलंदाजी दिली. त्याने होल्डरची लय बिघडवली. ह्या षटकात १ चौकार आणि षटकार यांच्या सहाय्याने १४ धावा निघाल्या. पुढचं षटक टाकण्यासाठी आवेश खान आला. पॄथ्वी शॉने त्याच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार मारत १३ धावा जमा केल्या. पाचवं षटक टाकायला रवी बिश्नोई आला. त्याने लयबद्ध मारा करत केवळ ५ धावा दिल्या. सहाव्या षटकात पुन्हा गोलंदाजीत बदल करत अॅण्ड्र्यू टायला चेंडू देण्यात आला. पॄथ्वी शॉने चौथ्या चेंडूवर चौकार मारत केवळ ३४ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यात त्याच्या ४६ धावा होत्या हे विशेष. पॄथ्वी शॉने पुढच्याच षटकात केवळ ३० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. पुढच्या षटकासाठी पुन्हा गौतमला पाचारण करण्यात आले. पॄथ्वी शॉने षटकार आणि चौकाराने त्याचे स्वागत केले. हा डावपेच चुकला असं वाटत असतानाच गौथमने त्याला ६१ धावांवर बाद केले. आणि उत्साहाला उधाण आलं. दिल्ली ६८/१ सगळं चित्र स्पष्ट करत होतं. पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने बेसावध वॉर्नरला बाद केले. रवी बिश्नोईने पुढच्या काही चेंडूंमध्ये रावमन पॉवेलला तंबूचा रस्ता दाखवला. दिल्लीचा संघ ७४/३ अशा दयनीय अवस्थेत पोहचला. कर्णधार ऋषभ पंतने सावध पवित्रा घेतला. संघाच्या १०० धावा जमा झाल्यावर ऋषभ पंतने फलंदाजीचं तंत्र बदललं. १६व्या षटकात ह्या दोघांनी १८ धावा काढल्या. सर्फराझ खानने लागोपाठ दोन चौकार मारून ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. आवेश खानने टिच्चून मारा करत धावसंख्या नियंत्रणात आणली. जेसन होल्डरनेही नियंत्रित गोलंदाजी करत केवळ ६ धावा दिल्या. आवेश खानने १९व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या. डावाचं शेवटचं षटक जेसन होल्डरला देण्यात आले. जेसन होल्डरनेही आपला अनुभव पणाला लावत केवळ ७ धावा दिल्या. दोन्ही विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवर असताना धावा रोखण्यात गोलंदाजांना चांगलंच यश मिळालं. दिल्लीचा संघ १४९/३ मजल गाठू शकला.
लखनौ सुपर जायंटसकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार के. एल. राहुल आणि क्विंटन डीकॉक उतरले. दोघंही छान सामंजस्य दाखवत खेळी सजवत होते. बघता बघता त्यांनी ७३ धावा़ंची भागीदारी रचली. कुलदीप यादवने के. एल. राहुलला १०व्या षटकात २४ धावांवर बाद केले. ईव्हिन लुईसला ललित यादवने झटपट तंबूचा रस्ता दाखवला. १६ षटकं चिवटपणे फलंदाजी केलेल्या डीकॉकला कुलदीप यादवने अखेरीस बाद केले. डीकॉकने ९ चौकार आणि २ षटकारांच्या ५२ चेंडूंमध्ये ८० धावा काढल्या. लखनौला विजयासाठी अजूनही २४ चेंडूंमध्ये २८ धावांची गरज होती. तीनही गडी बाद होण्यामध्ये कुलदीप यादवचा सहभाग होता, हा योगायोग ठरला. लखनौला शेवटच्या षटकात विजयासाठी ५ धावांची गरज होती. आणि शार्दुल ठाकूरने पहिल्याच चेंडूवर दीपक हुडाला बाद केले. तिसर्या चेंडूवर आयुष बदोनीने चौकार आणि पुढच्याच चेंडूवर षटकार मारत सनसनाटी विजय लखनौच्या नावावर कोरला. कृणाल पांड्यानेही बिनबाद १९ धावा काढल्या. लखनौने १५५/४ असा सफाईदार विजय मिळवला.
क्विंटन डीकॉकला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने विजयाचा शिल्पकार ठरताना ८० धावा काढल्या आणि यष्टीमागे पृथ्वी शॉचा झेलही टिपला. त्याच्या ह्या अष्टपैलू कामगिरीचा यथार्थ गौरव करण्यात आला.
उद्या पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना रंगणार आहे. हा सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे. नाणेफेकीसोबतच डावपेचही महत्वाची भूमिका पार पाडणार यात शंका नाही.