मुंबई: राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन करत आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांनी घराच्या आवारात घुसखोरी केली आहे. एवढंच काय तर त्यांनी घराच्या आवारात घुसून चप्पल फेक सुद्धा केली आहे. सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला असून, अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला. या आंदोलकांना आक्रमक पवित्रा घेत थेट शरद पवार यांचं मुंबईतील सिल्वर ओक हे निवासस्थान गाठलं. या निवासस्थानाच्या आवारात घुसून आंदोलक कर्मचाऱ्यांनी चप्पल फेक तसंच दगडफेक केली
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.