एरंडोल:-शहरातील सांडपाण्याची समस्या दूर होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका असलेल्या भुयारी गटार योजनेसाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या नगरोत्थान महाभियानांतर्गत योजनेतून सुमारे ९३ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.भुयारी गटार योजनेमुळे शहरातील सांडपाण्याची समस्या दूर होऊन विविध साथीच्या आजारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. तहसीलदार कार्यालय, नगरपालिका कार्यालय,नाट्यगृह बांधकामांसाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली असल्यामुळे शहरातील सौंदर्यात मोठी भर पडणार असल्याचा विश्वास उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यानंतर एरंडोल शहरासाठी पाच वर्षात प्रथमच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून अनेक कामे पूर्ण झाले असल्याचा दावा त्यांनी केला.शहरात भुयारी गटारी नसल्यामुळे सांडपाण्याची समस्या गंभीर बनली होती.शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमध्ये गटारी नसल्यामुळे सर्व सांडपाणी परिसरातच तुंबत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रहिवाशांना घराबाहेर पडणे देखील मुश्कील होते.सांडपाण्यामुळे नवीन वसाहतींमध्ये मोकाट डुकरे व कुत्रे यांचा मुक्त संचार राहत असल्यामुळे महिलावर्गात भीती व्यक्त केली जात होती.
नवीन वसाहतींमधील रस्त्यांची दुरुस्ती करून गटारींचे बांधकाम करून सांडपाण्याची समस्या सोडवावी या मागणीसाठी रहिवाशांनी आंदोलन करून साखळी उपोषण देखील केले होते.आमदार चिमणराव पाटील यांनी शहरासह नवीन वसाहतींमधील रहिवाशांना होणा-या त्रासाची दाखल घेवून शहरात भुयारी गटार योजना मंजूर व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री तथां उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार चिमणराव पाटील यांनी भेट घेवून भुयारी गटार योजनेस मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
शासनाने शहरासाठी भुयारी गटार योजनेसाठी ९३ कोटी ७६ लाख रुपये मंजूर केले असून यामध्ये आणखी सुमारे तीस कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.भुयारी गटारींमुळे शहरासह नवीन वसाहतींमधील सांडपाण्याची समस्या दूर होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.शहरात प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयांच्या बांधकामासाठी सुमारे अठरा कोटी रुपये,तसेच पालिका कार्यालयासाठी सुमारे तीन कोटी रुपये,बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी चार कोटी
तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी देखील निधी मंजूर झाला असून लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारसंघातील ग्रामीण भागात नागरी सुविधा योजनेअंतर्गत तसेच शहरासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विविध धार्मिक स्थळ परिसरात भाविकांसाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी सुमारे अडीच हजार सिमेंटचे बाक बसवण्यातआले असल्याचेही त्यांनी सांगितले.