मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आलं आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये ॲड.सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर झालेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्यावर आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं असून ही व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले.