मी सरकारी खात्यात काम करतो. चांगला पगार आहे, असे खोटे सांगून लग्नाच्या नावाखाली ५० महिलांची कोट्यवधी रुपयांत फसवणूक.
दिल्ली :- एका दहावी नापास व्यक्तीने तब्बल ५० हून अधिक महिलांना गंडा घातला आहे. “मी सरकारी खात्यात काम करतो. चांगला पगार आहे, पण मी एकटा आहे.पत्नीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात एकुलती एक लहान मुलगी असून तिच्या आधाराने मी माझे जीवन जगत आहे” असं खोटं सांगून मुकीम अय्यूब खान हा महिलांना आपल्या जाळ्यात अडकत होता घटस्फोटित आणि विधवा महिलांना टार्गेट करायचा. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर या महिलांकडून पैसे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटायचा आणि नंतर गायब व्हायचा.
या महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. तो बोलण्यात इतक्या पटाईत होता की सर्वच स्त्रिया त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या. एक महिला न्यायाधीशही तिच्या मुलीसह त्याच्या जाळ्यात अडकली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडल्यानंतर अय्यूब खानची पोलखोल झाली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील रहिवासी असलेल्या अय्यूबने आपल्या समोरील महिलांना इम्प्रेस करण्यासाठी गुजरातमधील वडोदरा येथील असल्याचं भासवायचा. या महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तो लग्नाबाबत चर्चा करायचा. संभाषणानंतर तो लग्नासाठी रिसॉर्ट, मॅरेज हॉल किंवा हॉटेल बुक करण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक करायचा.
२०१४ मध्ये त्याचं लग्न झालं. त्याला तीन मुलंही आहेत. २०२० मध्ये, त्याने मॅट्रिमोनिअल साइटवर बनावट प्रोफाइल तयार केलं आणि महिलांना फसवायला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यूबच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांनी फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने पोलिसांत तक्रार दिली नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अय्यूबच्या शोधासाठी वेगवेगळ्या राज्यात छापे टाकणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला गुरुवारी तो वडोदराहून दिल्लीत येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आपलं पथक तैनात केलं आणि निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून त्याला अटक केली. रायबरेली, रामपूर, लखनौ आणि दिल्लीच्या प्रीत विहारमध्ये त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.