विवाहिता अंघोळ करून बाथरूममधून बाहेर येत असताना तरुणाने घरात शिरून केला विनयभंग, अल्पवयीन मुलीचाही करत होता पाठलाग.

Spread the love

आरोपीस अटक, पोलिसांत ‘पोक्सो’ सह विनयभंगाचाही गुन्हा दाखल.

सोलापूर : अंघोळ करून बाथरूममधून बाहेर येत
असताना तरुणाने घरात शिरून विनयभंग केला, अशी फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलिसांत दिली. तर त्याच तरुणाने चार वर्षांपासून मुलीचा पाठलाग करून, तिला मेसेज करूनही त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून संशयिताविरूद्ध विनयभंगासह ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सिनेश जनार्धन रनशूर (वय २८) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ता २७ रोजी सकाळी नऊच्या सुमारास बाळे परिसरातील एक महिला घरातील बाथरूममध्ये अंघोळ करून बाहेर येत होती.

त्याचवेळी सिनेश रनशुर हा तरुण पीडितेच्या घरात अचानकपणे शिरला. बाथरुमचा दरवाजा ओढून आत आला. तोंड दाबून ओरडू नका म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले, असेही पीडित महिलेच्या फिर्यादीत नमूद आहे. दुसरीकडे पीडितेची अल्पवयीन मुलगीही यात फिर्यादी आहे. सिनेश रनशुर हा मुलीलाही चार वर्षांपासून मोबाईलवर मेसेज करतोय. तसेच तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्या तरूणाविरूद्ध पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, दुय्यम पोलिस निरीक्षक विकास देशमुख, पोलिस उपनिरीक्षक राधा जेऊघाले यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून सिनेश रनशुरविरूद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला काही वेळात जेरबंद केले.

मुख्य संपादक संजय चौधरी