मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयास धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने गळा दाबून संपवलं, मृतदेह बस स्टँडवर ठेवून घरी रवाना.

Spread the love

मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयास धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने गळा दाबून संपवलं, मृतदेह बस स्टँडवर ठेवून घरी रवाना.

कोल्हापूर : मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयाचा सासू- सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्येच गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, शिरोळ) असे मृताचे नाव आहे. गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटी प्रवासात खून करून बुधवारी रात्री दहाच्या सुमारास संदीपचा मृतदेह बसस्थानकावर टाकून संशयितांनी पळ काढला होता. पोलिसांनी याप्रकरणी संशयित सासरा हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (४९) व सासू गौरा हणमंताप्पा काळे (४५, रा. भडगाव, गडहिंग्लज, मूळ नायनगर, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मध्यवर्ती बसस्थानक आवारातील एस.टी. प्रोव्हिजन या दुकानाच्या कट्ट्यावर अनोळखी तरुण बेशुद्धावस्थेत मिळून आला होता. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण होते. गळा आवळून खून झाल्याचे समोर आल्याने याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. मृताच्या खिशामध्ये एक डायरी व किल्ल्या मिळाल्या. डायरी संदीप शिरगावे असे नाव होते. तसेच त्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांकही मिळाला. पोलिसांनी तिला माहिती देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणला.

बुधवारी रात्रीच मृतदेह टाकून पोबारा….

मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एक पुरुष व एक महिला मृत संदीप शिरगावला बेशुद्धावस्थेत मध्यवर्ती बसस्थानकातील दुकानाच्या कट्ट्यावर ठेवताना दिसून आले. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी त्या तरुणाच्या पत्नीशी संपर्क साधला. गडहिंग्लजचे निरीक्षक गजानन सरगर यांना मृतदेहाचे व संशयितांचे फुटेज पाठविण्यात आले. यावेळी मृतदेह टाकून पोबारा करणारे मृताचे सासू- सासरा असल्याचे समोर आले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले होते.

घटस्फोटानंतरही गेला होता घरी….

काळे यांची मुलगी करुणा हिचा विवाह संदीपसोबत झाला होता. संदीप खासगी चालक होता. तो दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिऊन वारंवार पत्नी करुणाला त्रास देत होता. त्यामुळे दोघांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर करुणा गडहिंग्लज येथे माहेरी गेली होती. चार दिवसांपूर्वी संदीपही तिच्या माहेरी गेला. तेथे सासू-सासऱ्यांनी त्याची समजूत घातली. काही दिवसांनी मुलीला पाठवतो, असे सांगून त्यांनी संदीपला माघारी पाठविले होते. गडहिंग्लज बसस्थानकावर एसटीमध्ये बसून काही अंतरावर तो पुन्हा उतरून पत्नीच्या घरी गेला. त्यामुळे पुन्हा वाद झाला होता.संदीप ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सासरा हणमंताप्पा व सासू गौरा यांनी त्याला कोल्हापुरात सोडून येतो, असे मुलीला सांगितले. तिघांनीही बुधवारी गडहिंग्लज ते कोल्हापूर प्रवासाची एस. टी. तिकिटे काढली. प्रवासात संदीप शेवटच्या सीटवर बसला होता. सासू-सासरे पुढील बाजूला बसले. एसटी विनावाहक असल्याने या तिघांसह केवळ पाचच प्रवासी बसमध्ये होते; मात्र, तिघांमध्ये पुन्हा वाद झाला. एसटी कागलजवळ आली असताना हणमंताप्पा व गौरा यांनी संदीपच्या बॅगेतील नाड्याने त्याचा गळा आवळून खून केला.

मृतदेह टाकून गडहिंग्लजला परतले….

एसटी बसमध्येच संदीपचा मृतदेह घेऊन दोघे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर उतरले. तो आजारी असल्याचा बहाणा करून मृतदेह मध्यवर्ती बसस्थानक आवारातील एस.टी. प्रोव्हिजन दुकानाच्या कट्ट्यावर ठेवला. यानंतर दोघेही गडहिंग्लजला निघून गेले. मध्यरात्री गडहिंग्लज बसस्थानकावर उतरून घरी निघून गेले होते. गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला होता. सायंकाळच्या सुमारास दोघांना ताब्यात घेण्यात आले.

मुख्य संपादक संजय चौधरी