शेतकरी तरुणाचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Spread the love

हिंगोली : आपल्या प्रेमाची कहानी सांगण्यासाठी शेतकरी तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून तरुणाने मुख्यमंत्र्यांना आपल्या प्रेमाची व्यथा सांगितली आहे.नेमकं ते पत्र कुणाचं आहे? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

नेमकं काय लिहलं आहे पत्रात?
शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का…? असा सवाल एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे. या पत्रात म्हटले की, ‘खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. उद्धवसाहेब, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता. त्यांचे प्रश्न सोडवता, माझं काय?’ असंही या युवकानं म्हटलं आहे. हे पत्र समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पत्रात युवकानं म्हटलं की, ‘उद्धवसाहेब आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेत आलात. त्यांचे प्रश्न सोडवता. माझं काय? या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा जगातून निघून जाण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देत आहे साहेब, वाट पाहतोय’, असं पत्रात म्हटलं आहे

पत्रामध्ये पुढे लिहिलं की, ‘साहेब लिहिताना खूप दुःख होत आहे. साहेब तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होत का हो? आयुष्यात कधी तरी केलं असेल उत्तर द्या. प्रेम हे धन-दौलतीचे मोहताज असते का हो…? मी पण कोणावर तरी प्रेम केलं होतं पण शेत जमीन कमी असल्याने प्रेमाला विरोध असं असतं का हो…?’ असा सवाल युवकानं पत्रातून केला आहे.

टीम झुंजार