ठेवींवर अधिक व्याज देण्याचं आमिष दाखवत,हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला अन् मथुरेत साधुच्या वेषात राहू लागला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Spread the love

बीड :- महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घालून ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या एका सराईताला पोलिसांनी मथुरा येथून बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घातल्यानंतर हा आरोपी साधूचा वेष घेऊन लपला होता.पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत त्याला हुडकून काढले आणि बेड्या ठोकल्या. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बबन विश्वनाथ शिंदे या आरोपीला वृंदावन आणि बीड जिल्हा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कृष्ण बलराम मंदिराजवळून बेड्या ठोकल्या. आरोपी शिंदे हा सुमारे ३०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांना हवा होता.

पोलीस उपधीक्षक संदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, शेकडो लोकांना गंडा घालणारा शिंदे पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून एका साधूचा वेश करून दिल्ली, आसाम, नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमधून लपूनछपून राहत होता. अखेर तो वृंदावनाजवळ लपलेला असताना पोलिसांच्या हाती लागला.याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस. एस. मुर्कुटे यांनी अधिक माहिती सांगितले की, आरोपी बबन विश्वनाथ शिंदे याने लोकांना त्यांच्या ठेवींवर अधिकचं व्याज देण्याचं आमिष दाखवलं होतं. त्याने राज्यातील चार सहकारी बँकांमध्ये पैसे ठेवण्यास ठेवीदारांना राजी केलं होतं. एवढंच नाही तर आरोपीने केलेल्या फसवणुकीमध्ये चोरीच्या पैशांनी खरेदी केलेल्या संपत्तींचाही समावेश आहे. आरोपीने २ हजारांहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

मुख्य संपादक संजय चौधरी