३७५ वर्षाची श्री बालाजी यात्रेची परंपरा भंग,पारोळ्याच्या इतिहासात दुर्दैवी घटना
पारोळा :- ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या वहनाच्या मिरवणुकीत वाहन ओढण्याच्या मुलांच्या भानगडीचे पर्यावसन मोठ्यांच्या भानगडीत झाले असून भयानक दगडफेक झाली. त्यात पारोळा येथील तीन तर बाहेरून बंदोबस्तास आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास देखील मार लागला आहे. रात्री साडेआठच्या सुमारास सुरू झालेल्या या भानगडीस रात्री साडेबारा वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यात पोलीस दलास यश आले आहे.
प्रत्यक्ष घटनास्थळी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, उपाध्यक्ष कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी चोपडा अण्णासाहेब घोलप त्याचबरोबर अमळनेर, अमळगाव, धरणगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी, जळगाव येथील एस आर पी चे दोन प्लॅटोन, पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार व येथील सर्व पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे जवान यांनी परिश्रम घेतले.
या कारवाईत २४ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी आरोपींची ओळख परेड सुरू असून आरोपीच्या संख्या वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी १२ आरोपींना ताब्यात घेतले आहे. चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप तळ ठोकून आहेत.
दरम्यान घडलेली घटना अशी की, बुधवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास श्री बालाजी महाराजांचे पहिले वहन हे भवानी गड येथे आले असता वाहन ओडण्यावरून झालेल्या वादातून दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच गुप्त शाखेचे महेश पाटील व किशोर भोई हे घटनास्थळी धावून गेले. घटना हाताबाहेर जात आहे असे पाहता त्यांनी पोलीस कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली.
सदर दोन समाजातील हा संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी विनंती केली असता दोघ पक्षांनी काही एक ना ऐकता दगडफेक सुरूच ठेवली होती त्यात गुप्त शाखेचे महेश रामराव पाटील यांच्या डाव्या कानाच्या वर डोक्यावर कोणीतरी काठी सदृश्य वस्तू मारल्याने त्यांना जागेवरच भोवळ आली त्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक तिवारी यांना पायावर वातावर दगडाचा जबर मार लागल्याने फॅक्चर झाले आहे त्यांना जळगाव येथे तर महेश पाटील यांचेवर पारोळा येथे उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे गृहरक्षक दलाचे दोन जवान भटू पंडित पाटील व धोंडू रोहिदास लोंढे हे देखील जखमी झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांना कामात अडचण आणून त्यांच्यावर हल्ला करणे, सार्वजनिक संपत्तची हानी, सरकारी वाहनाचे नुकसान विद्युत मंडळाचे रोहित्राचे दगड मारून नुकसान करणे आशा विविध गुन्ह्याखाली पारोळा पोलिसात कॉन्स्टेबल किशोर देविदास भोई यांनी नवीन कायदा २०२३ भारतीय न्याय संहिता अंतर्गत फिर्याद दिली आहे.
३७५ वर्षाची श्री बालाजी यात्रेची परंपरा शांततेत पार पडत असताना अशा पद्धतीने शांतता भंग व्हावे हे पारोळ्याच्या इतिहासात दुर्दैवी घटना म्हणावे लागेल. तरी हा आपल्या गावाचा उत्सव शांततेत पार पडावा याकरिता कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा, या करिता शांततेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.