पाचोऱ्यात गरबा खेळताना दांडिया किंग’तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ.

Spread the love


पाचोरा :- गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशात सर्वत्र नवरात्रीचं मंगलमय वातावारण असून रास गरबा, दांडियाची धूम आहे. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात पाचोऱ्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे.
गरबा खेळताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने दांडिया प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळ दांडिया गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एका २६ वर्षीय युवकाचा गरबा खेळताना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय युवकाच्या मृत्यूने स्थानिक नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

नेमकं काय घडलं?

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळील दांडिया गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी कॉलनी रहिवाशी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी (२६) हा दांडिया खेळत असतानाच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला तत्काळ जवळील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. यावेळी डॉ भुषण मगर यांच्या सह वैद्यकीय टीमने त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळालं नाही. लखनच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरल्यानंतर सर्वांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेनंतर काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील तत्काळ भेट दिली.

शहरातील दांडिया प्रेमीमध्ये लखन होता प्रसिद्ध

लखन वाधवानी हा दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. दरवर्षी ‘दांडिया किंग’चा माणकरी ठरत होता. त्याच्या कुटुंबाची अत्यंत नाजूक परीस्थिती आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता. चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर कामाला होता. त्याच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मागील काही वर्षांत गरबा खेळताना काही तरुणांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहेत. तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटका येण्याचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसत आहे. हृदयविकाराच्या झटका येण्याचं प्रमाण वाढू लागल्याने तरुणांची चिंता वाढली आहे.

कुटूंबाचा आधार हरपला –

लखन वाधवाणी सिंधी कॉलनी येथील अतिशय गरीब कुटुंबातील तरुण होता. रमेशलाल वाधवाणी यांचा तो एकुलता एक मुलगा होता. लखन चाळीसगाव येथील पेट्रोल पंपावर नोकरी करत होता. त्याचे वडील बूट चप्पलच्या दुकानात कामाला होते. दोघे कष्ट करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. लखन दांडिया खेळण्यात माहिर होता. तो मागील वर्षी एका मंडळामध्ये दांडिया किंग देखील ठरला होता. लखनला डॉक्टरांनी मृत घोषित करताच त्याच्या कुटुंबाने मोठा आक्रोश केला. त्यांच्या कुटूंबाचा आधार हरपल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी