मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा सतरावा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादनेने ८ गडी आणि १४ चेंडू राखून योजनाबद्ध पद्घतीने जिंकला. १५व्या मोसमातला हा त्यांचा पहिला विजय आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळाची सुरूवात करायला रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड उतरले. दोघांच्याही टप्प्यात चेंडू येत नसल्यामुळे धावांचा वेगही वाढत नव्हता. त्याच संधीचा फायदा वॉशिंग्टन सुंदरने घेतला. त्याने रॉबिनला तंबूची वाट दाखवली.
मोईन अली त्याच्या नेहमीच्या पद्घतीने खेळू लागला पण गायकवाड अजूनही चाचपडत होता. नटराजनने त्याची द्विधा अवस्था ओळखली आणि त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. अंबाती रायडूने मोईन अलीला चांगली साथ दिली. त्या दोघांनी संघाच्या खात्यावर ६२ धावा जोडल्या. रायडूने २७ धावा काढल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला बाद केले. मोईन अली ४८ धावांवर असताना आयदेन मार्करामने त्याला बाद केले. दोन्ही जम बसलेले खेळाडू लागोपाठ बाद झाले आणि १५व्या षटकात चेन्नई १०८/४ अशा अवस्थेत पोहचला. शिवम दुबे केवळ ३ धावा काढून नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार रवींद्र जडेजा धावा जोडण्याचा प्रयत्न करत होता पण इतक्यात महेंद्रसिंग धोनी देखील मार्को जानसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. संपूर्ण मैदानात शांतता पसरली. रवींद्र जडेजाला भूवनेश्र्वर कुमारने २३ धावांवर बाद केले. चेन्नईचा डाव २० षटकांत १५४/७ ह्या धावसंख्येपर्यंत कसाबसा पोहचला. विजयासाठी खरंतर अजून ४०-५० धावा अजून हव्या होत्या., हे प्रकर्षांने जाणवलं. पुन्हा एकदा कागदावरचे सिंह खेळपट्टीवर मांजर झाले.
सनरायझर्स हैदराबादकडून खेळाची सुरूवात करायला अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विल्यमसन उतरले. दोघांचीही देहबोली सकारात्मक होती. दोघांनाही काय करायचं आहे हे पक्कं ठाऊक होतं त्यामुळे त्यांनी योजनाबद्ध फलंदाजी करत गुणलेखकाला सतत व्यग्र ठेवण्याचं काम केलं. मोईन अलीच्या ८ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केन विल्यमसनने जबरदस्त षटकार ठोकत संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या. ९व्या षटका अखेर हैदराबाद ६२ धावा काढून सामना काही षटके राखून जिंकण्याचे मनसुबे आखत होता आणि त्यांच्यावर दडपण टाकण्यासाठी गडी बाद करण्याची गरज होती. पुढच्या १० षटकात हैदराबादला ८६ धावांची गरज होती. इतकावेळ ज्या तडाखेबंद खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता त्या अभिषेक शर्माने केवळ ३१ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. आणि १२व्या षटकाच्या अखेरीस हैदराबाद बिनबाद ८९ वर पोहचले. पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर केन विल्यमसन मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर ३२ धावांवर बाद बाद झाला. राहुल त्रिपाठी फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. ब्राव्होच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने सणसणीत चौकार मारत संघाच्या १०० धावा पूर्ण केल्या. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी एकमेकांना साथ देत डावाला आकार देत होते. हैदराबादला शेवटच्या ३० चेंडूंत ३४ धावांची गरज होती. १६ षटकांनंतर हैदराबाद १२५/१ अशा भक्कम अवस्थेत होता. राहुल त्रिपाठीने चौकार मारत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यात त्याच्या १३ चेंडूंत ३४ धावा होत्या हे विशेष. विजयाचं समीकरण १८ चेंडूंत ११ धावा असं झालं. आणि ड्वेन ब्राव्होने हैदराबादचा घात केला. अभिषेक शर्माला ७५ धावांवर बाद करत हैदराबादची विजयाची वाट अडवली. निकोलस पुरनवर गडी बाद झाल्याचा कोणताच प्रभाव जाणवला नाही. त्याने आल्या आल्या सणसणीत चौकार ठोकला. आणि ह्याच अठराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबाद ह्या मोसमातला पहिला सामना जिंकला. १८ षटकांत १५५/२ असा विजय हैदराबादने मिळवला.
अभिषेक शर्माला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने विजयाचा शिल्पकार ठरताना ५ चौकार आणि ३ षटकार यांच्या सहाय्याने ५० चेंडूंत ७५ धावा काढल्या.
आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर रंगणार आहे. आज मुंबई त्यांचं खातं उघडणार का, हा औस्तुक्याचा विषय आहे.