टाटा आयपीएल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा थाटात विजय

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा अठरावा सामना आणि आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर बेंगळुरूच्या संघाने ७ गडी आणि ९ चेंडू राखून जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबई इंडिअन्सकडून खेळाची सुरूवात करायला ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. दोघांच्याही टप्प्यात चेंडू चांगला येत असल्यामुळे धावांचा वेगही वाढत होता. हर्षल पटेलने स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर झेल घेत रोहित शर्माला २६ धावांवर बाद केले. वानिंदू हसरंगाने डिवाल्ड ब्रेविसला झटपट पायचीत पकडले. लवकरच ईशान किशनला २६ धावांवर बाद करत आकाशदीपने मुंबईला जबरदस्त दणका दिला. त्याच षटकात तिलक वर्माला ग्लेन मॅक्सवेलने शून्यावर धावबाद केले. पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर वानिंदू हसरंगाने किरॉन पोलार्डला शून्यावर पायचीत पकडले. मुंबईचा अर्धा संघ केवळ ६२ धावांमध्ये तंबूमध्ये परतला होता. हर्षल पटेलने रमणदीप सिंगला झटपट बाद केले. १४व्या षटकाच्या अखेरीस मुंबईची धावसंख्या ८०/६ अशी होती. सुर्यकुमार यादवने चांगली फटकेबाजी करत १७व्या षटकात १०० धावांवर पोहचवली. सुर्यकुमार यादवने केवळ ३२ चेंडूंत ५० धावा झळकावल्या. मुंबईचा संघ केवळ सुर्यकुमार यादवमुळे १५० धावा धावफलकावर पाहू शकला. जयदेव उनाडकटने बिनबाद १३ धावा काढल्या तर सुर्यकुमार यादवने बिनबाद ६८ धावांची खेळी साकारली. बेंगळुरूच्या संघाला विजयासाठी १५२ धावांची गरज होती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आजचा सामना सहज खिशात घालायचा याच उद्देशाने खेळत होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि अनुज रावत उतरले. दोघांचीही देहबोली सकारात्मक होती. त्याचेच परिणाम त्यांच्या खेळातून दिसत होते. ८व्या षटकात बेंगळुरूच्या खात्यावर बिनबाद ५० धावा जमा झाल्या. आणि पुढच्याच षटकात जयदेव उनाडकटने फाफ ड्युप्लेसिसला बाद केले. विराट कोहलीने खेळपट्टीचा ताबा घेतला. इतकावेळ शांत संयत खेळी साकारणार्‍या अनुज रावतने ३८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेंगळुरू संघाच्या १०० धावा आणि योगायोग म्हणजे अनुज रावत आणि विराट कोहलीने ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. बेंगळुरूला विजयासाठी २४ चेंडूंत ३० धावांची गरज होती. १७ व्या षटकात अनुज रावतला ६६ धावांवर रमणदीप सिंगने धावबाद केले. बेंगळुरूला विजयासाठी १८ चेंडूंमध्ये २१ धावांची गरज होती. बेंगळुरू प्रत्येक चेंडूनंतर विजयाच्या अधिक जवळ पोहचत होता आणि त्याचवेळी डिवाल्ड ब्रेविजने विराट कोहलीला ४८ धावांवर पायचितच्या स्वरुपात बाद केलं. पण ग्लेन मॅक्सवेलने लागोपाठ दोन चौकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केलं. बेंगळुरूने १५२/३ असा थाटात विजय आपल्या नावावर कोरला. बेंगळुरूचा हा तिसरा विजय तर मुंबईचा सलग चौथा पराभव झाला. मुंबईचा संघ आपल्या खेळाचं आत्मपरीक्षण करणार का? संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक, उप-प्रशिक्षक आणि खेळाडू यांनी एकत्र बसून पराभवाची कारणं शोधून पुढील सामन्यांमध्ये वैयक्तिक खेळाडू म्हणून नाही तर संघ म्हणून उतरून विजयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतील का? रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्डने काही सामने सक्तीची विश्रांती घ्यावी का?

अनुज रावतला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने विजयाचा शिल्पकार ठरताना २ चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ४७ चेंडूंत ६६ धावा काढल्या.
उद्या पहिला सामना कोलकत्ता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्याच वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. एक जबरदस्त रविवार आणि दोन दणकेबाज सामने प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहेत.

टीम झुंजार