मोकाट डुकरे व कुत्र्यांच्या मुक्त संचारमुळे महिला व बालकांमध्ये भीतीचे वातावरण,नगरपालिका प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करा नागरिकांची मागणी.

Spread the love

एरंडोल :- शहरात प्रमुख रस्त्यांवर तसेच नवीन वसाहतींमध्ये मोकाट कुत्रे व डुकरे यांच्या मुक्त संचारामुळे महिला व बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिकेने याबाबत त्वरित दखल घेवून डुकरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहरात दोन दिवसात तीन ते चार जणांना कुत्रे व डुकरांनी चावा घेवून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच म्हसावद नाका,कासोदा दरवाजा,अंजनी नदी पात्र परिसर,नवीन वसाहतींमध्ये डुकरे व मोकाट कुत्रे गटागटाने फिरत असून लहान बालके,महिला,वाहन चालक यांच्यावर अचानक हल्ला करीत असल्यामुळे
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डुकरांच्या पिलांवर कुत्रे हल्ला करून जखमी करीत असल्यामुळे अनेक डुकरांचे पिल्लू जखमी अवस्थेत शहरात फिरत आहेत. म्हसावद नाका परिसर,काबरे विद्यालय परिसर,नवीन वसाहतींमधील मोकळ्या जागा याठिकाणी डुकरे व कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे याठिकाणी दैनंदिन कामासाठी येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.पंधरा ते वीस कुत्र्यांचा समुख अचानक दुचाकी वाहनांच्या मागे लागून हल्ला करीत असल्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरातील विविध उपहारगृहे, भाजी बाजार या गर्दीच्या ठिकाणीच डुकरे व कुत्रे फिरत असतात. म्हसावद नाका परिसरातच शाळा व महाविद्यालय तसेच व्यापार संकुल व दवाखाना असल्यामुळे शेकडो नागरिक विद्यार्थ्यांची वर्दळ
याठिकाणी असते.

शहरात दोन दिवसात तीन ते चार जणांवर डुकरे व कुत्र्यांनी अचानक हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या असून पालिकेने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.डुकरे व कुत्र्यांच्या त्रासामुळे शाळेतून घरी येणारे तसेच घराच्या परिसरात खेळणा-या मुलांसह पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत पालिकेने त्वरित दखल घेवून शहरात
मोकाट फिरणारे डुकरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करून महिला व बालकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी