बाजार समितीचे माजी सभापती यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांनी बँकेत 13 कोटींचा अपहार प्रकरणी पोलिसांनी केली अटक.

Spread the love

बीड :- जिल्ह्यातील पाटोदा येथील महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना पाटोदा पोलिसांनी अटक केली आहे.13 कोटींच्या अपहार प्रकरणी ही अटक करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सन 2011 ते 2015 कालावधी दरम्यान महात्मा फुले अर्बन बँकेमध्ये 13 कोटींचा बनावट दस्तावेज सादर करून सत्यभामा बांगर यांनी अपहार केल्याचा आरोप आहे.

रामकृष्ण बांगर यांनी देखील पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना बाजार समितीची जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात देखील गुन्हा नोंद झाला होता. आता त्यांच्या पत्नी बँकेच्या अपहार प्रकरणात अडचणीत आल्या असून त्यांना अटक झाली आहे. सत्यभामा बांगर यांनी कोणतीही कागदपत्रं न घेता, तारण न घेता बनावट कागदपत्रं तयार करून ते खरी असल्याचं भासवून 13 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. आता याच प्रकरणात बांगर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

बीडमधील 300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बबन शिंदे यांना अटक

तीनशे कोटींचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटचा अध्यक्ष बबन शिंदे याला उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता आणि तो पोलिसांना चकवा देत होता. बीडसह जिल्ह्यात पाच ठिकाणच्या शाखांमधून बबन शिंदे याने तीनशे कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला. या प्रकरणात बीडसह पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता बीड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये अनेक बँकांकडे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. या घोटाळ्याच्या मालिकेतील सर्वात आधी गुंतवणूकदाराची मोठी फसवणूक बबन शिंदे याच्या मल्टीस्टेट बँकेने केली होती.बीडमध्ये ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे आणि त्यांचे पती बबन शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य संपादक संजय चौधरी