हाथरस (उत्तर प्रदेश) :- लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षणांपैकी एक असतो. भारतासह जगात वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करतात. मात्र अनेक देशांमध्ये जवळील नात्यात लग्न करणे टाळतातअशातच आता उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका भावाने आपल्या बहिणीशी लग्न केले आहे. या दोघांनी सामूहिक विवाह योजनेअंतर्गत एकमेकांशी लग्न केले आहे. आता हे भावा-बहिणीचे लग्न आणि त्यामागील धक्कादायक कारण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी SDM कडे या प्रकरणाची तक्रार केली. हे संपूर्ण प्रकरण काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाऊ आणि बहिणीचे एकमेकांशी लग्न
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत सरकारी लाभ मिळवण्यासाठी एका भावाने स्वतःच्या बहिणीशी लग्न केले. सामूहिक विवाहाअंतर्गत वधूच्या बँकेत 35,000 रुपये, नवविवाहित जोडप्याला 10 हजार रूपयांच्या अत्यावश्यक वस्तू आणि लग्नासाठी 6,000 रुपये तसेत देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. या योजनेंतर्गत पैसे मिळवण्यासाठी भाऊ-बहिणीने एकमेकांशी लग्न केल्याचे समोर आले आहे. मात्र अल्पावधीतच या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी स्थानिक SDM कडे या प्रकरणाची तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच SDM वेदसिंह चौहान यांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिले. तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातरसमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 217 जोडप्यांचे लग्न झाले. याच सोहळ्यात या भावा-बहिणीचेही लग्ने झाले होते. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
सरकारी फायद्यासाठी अनेकजणांचा पुनर्विवाह
समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी फायद्यासाठी लोकांनी लग्न केल्याची ही पहिलीच घटना नाही. सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लोक पुनर्विवाह करत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, सिकंदर रावमधील दोन विवाहित जोडप्यांनी सामूहिक विवाह योजनेअंतर्गत पुनर्विवाह केला होता. तसेच एका सरकारी कर्मचाऱ्याने आर्थिक फायद्यासाठी या योजनेअंतर्गत बनावट लग्न दाखवले होते. ही योजना मुख्यत्वे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी आहे, परंतु या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी लोक सरकारची फसवणूक करत आहे. आता SDM ने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी पुनर्विवाह केला, मात्र सरकारी फायद्यासाठी भावाने बहिणीशी लग्न करण्याची ही पहिलीच घटना आहे.