कासा :- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार रात्री चारोटी उड्डाणपुलाखाली मुले चोरणाऱ्या टोळीस कासा पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांच्या चौकशीत संशयित आरोपींनी कल्याण येथून दोन मुले चोरल्याचं मान्य केले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी, चंदा गोसावी, जयश्री गोसावी, आणि राहुल गोसावी असून ते सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत. या संशयितांनी सुरज कुमार मिश्रा (८ वर्षे) आणि सत्यम कुमार मिश्रा (५ वर्षे) यांना कल्याण येथून फसवून आणण्यात आलं होतं.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, रात्रीच्या वेळी कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे आपल्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालत असताना मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाण पुलाखाली काही महिला -पुरुष हे वाद विवाद करत होते. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी कासा पोलिस गेले. भांडण करणाऱ्यांमध्ये दोन लहान मुले होती. त्यांची पोलिसांनी विचारपूस केली असता, ती कल्याण मधील असल्याचे त्यांनी सांगत आम्हाला सदरच्या माणसांनी फसवून येथे आणल्याची माहिती त्या मुलांनी पोलिसांना दिली.
या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी कासा पोलिसांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात संपर्क केला असता, येथे हरवलेली मुलं म्हणून त्यांची नोंद होती अशी माहिती मिळाल्यावर संबंधित मुले चोरणाऱ्या टोळीला कासा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदर संशयित आरोपी पुरुष, महिला व चोरल्या गेलेल्या दोन मुलांना कल्याण महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती, कासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी दिली.
कासा पोलिसाचे कौतुक..
कासा पोलीस ठाणे हे मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग असून चारोटी, कासा, महालक्ष्मी मंदिर परिसरात येथे उड्डाण पुल, तसेच रस्त्याच्या कडेला अनेक पर प्रांतीय, तसेच कचरा गोळाकरणे, भंगार जमवणे आदी कामाच्या नावाने असंख्य नागरिक त्यांची ओळख नसताना राहत आहेत. त्यामुळे या भागात अश्या अनोळखी नागरिकांकडून अनेक वेळा गुन्हे घडत असून पोलिसांना आव्हान देत असतात. अशातच कासा पोलिसांनी शुक्रवारी मिरज सांगली मधील अनोळखी नागरिकांनी चारोटी येथे कल्याण हुन दोन मुले चोरून आणली होती. त्या टोळीचा पर्दाफाश केला. ही कामगिरी कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांदळे, पोलीस कर्मचारी अविनाश जाधव, जगदीश जाधव व ईस्त्राईल सय्यद यांनी केली असून त्यांचे परिसराततून कौतुक केले जात आहे.