चोपडा :- शेतात केळीचे खोड लावत असताना दुपारी दोनच्या सुमारास डोक्यावर वीज पडून लोणी (ता. चोपडा) येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गरीब कुटुंबातील कर्ता गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून, त्याच्या कुटुंबीयांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.लोणी येथील शिवाजी चैत्राम कोळी (वय ३५) याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे मजुरी करून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होता. मंगळवारी (ता. १५) खर्डी शिवारात मंगल पाटील यांच्या शेतात केळीचे खोड तो लावत होता. दुपारी दोनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
शिवाजी कोळी याच्या डोक्यावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तत्काळ अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्यावर लोणी येथे रात्री शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी कोळी यांच्या मागे आई, वडील, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची सर्व जबाबदारी शिवाजी कोळीवर होती. शासनाने कोळी कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.