दोघांनी केला प्रेमविवाह, कामासाठी गेला बाहेरगावी, भाऊ समजून मित्राला सांगितलं अन् तोच बायकोसोबत सापडला, पुढे जे घडल ते भयंकर.

Spread the love

कटिहार :- आजकाल विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा नातेसंबंधातून अनेकदा अमानुष मारहाण आणि खुनाच्या घटनादेखील घडतात. कटिहारमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. तिथे सध्या चर्चेत असलेल्या विष्णू मंडल हत्याकांड प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मृत विष्णूचा मित्र, मित्राची पत्नी आणि आणखी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी कटिहारमधल्या मनिया रेल्वेलाइनच्या शेजारी पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात मृतदेह आढळला होता. हा मृतदेह एका गोणीत होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टेम केलं. हा मृतदेह विष्णू मंडल नावाच्या व्यक्तीचा असल्याचं समोर आलं.

कटिहारचे डीएसपी अभिजित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू 13 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आणि विष्णू मंडलच्या कुटुंबीयांची चौकशी करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मित्र फटकन मंडल याची पत्नी तमन्ना खातून उर्फ स्विटी हिच्याशी विष्णूचे प्रेमसंबंध होते. पोलिसांनी स्विटीची चौकशी केली. काही काळापूर्वी स्विटी आणि फटकन यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर फटकन कामासाठी दिल्लीला गेला होता. त्याने स्विटीची काळजी घेण्याची जबाबदारी विष्णूवर सोपवली होती. फटकनच्या अनुपस्थितीत विष्णू आणि स्विटीची जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर विष्णू एकदा स्विटीला घेऊन दिल्लीला देखील गेला होता. तिथून परतल्यानंतर दोघंही एकत्र राहत होते.

फटकनला याची माहिती मिळताच तो गावी परत आला. त्याने पत्नीसोबत मिळून विष्णूला मारण्याचा कट रचला. दोघांनी विष्णूला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि तो दारूच्या नशेत असताना त्याचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर दोघांनीही मृतदेह गोणीत भरून संजय मंडलच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावली. आरोपींनी विष्णूच्या दुचाकीचे अनेक तुकडे केले आणि ठिकठिकाणी खड्डे खोदून ते जमिनीत पुरून टाकले.सर्व आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी