मुलगी झोपेत असताना तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व लोखंडी अँगलने मारहाण करून गंभीर जखमी करून तिचा खून करून स्वत: पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली होती.
सातारा :- लग्नासाठी आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही, म्हणून मुलगी झोपेत असताना वडिलांनी रागाने तिच्या डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता.या प्रकरणात आरोपी शंकर बजरंग शिंदे (वय ७८, रा. औंध) या वृद्धास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
शिंदेने १९ फेब्रुवारी २०१२ रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान मुलगी झोपेत असताना तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व लोखंडी अँगलने मारहाण करून गंभीर जखमी करून तिचा खून करून स्वत: पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली होती. याप्रकरणी औंध पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सी. आर. शिर्के यांनी केला होता. त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून पूर्ण तपास करून आरोपी शिंदेविरुद्ध वडूज येथे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायालयात याकामी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले.
या खटल्यामध्ये ११ साक्षीदार सरकार पक्षाच्या वतीने तपासण्यात आले होते. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपी शिंदेला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी, तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलिस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, सहायक पोलिस फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, आमीर शिकलगार, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.