विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊटमध्ये मॅग्झीनसह ६ पिस्टल, १६ तलवारीसह विविध हत्यारे, दारूसाठा हस्तगत ७ जणांना घेतल ताब्यात.

Spread the love

धुळे :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात नाकाबंदीसह ‘ऑल आउट ऑपरेशन’ राबविण्यात आले.त्यात मॅग्झीनसह सहा पिस्टल, आठ जिवंत काडतुसे आणि १६ तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच १७ फरार आरोपींना गजाआड केले. शिवाय १८ लाख किमतीची विदेशी दारू, गांजा, गुटखा जप्त करताना गावठी हातभट्टी अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळाचे धाबे दणाणले आहे. विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत हे ‘ऑपरेशन’ राबविले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखा व शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदविला. ‘ऑपरेशन’ प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलिस अधीक्षक धिवरे यांनी ठिकठिकाणी देखरेख करत नाकाबंदीस्थळी भेट दिली.

सात जणांवर कारवाई

असामाजिक तत्त्वांवर कारवाई करताना दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी बनावटीचे कट्टे (पिस्टल) बाळगणाऱ्या सात संशयितांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सहा गावठी बनावटीचे कट्टे व आठ जिवंत काडतुसे, एक मॅग्झीन हस्तगत करण्यात आले. स्थानिक गुन्हा शाखेने मोहाडीतून संशयित अशोक धोंडू चौधरी (वय ३२) याच्याकडून तीन पिस्टल, तीन राउंड, धुळे शहर पोलिसांनी संशयित शेख नसीर शेख सद्दाम शेख (वय २६, रा. शंभर फुटी रोड, हाजी सिद्दीकीनगर, धुळे) याच्याकडून एक पिस्टल व दोन राउंड, चाळीसगाव रोड पोलिसांनी संशयित विश्‍वजित ज्ञानेश्‍वर चौगुले (वय २४, रा. पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) याच्याकडून एक पिस्टल व एक राउंड, शिरपूर तालुका पोलिसांनी संशयित अब्दुलाखान कादरखान पठाण (वय २५, रा. दांडेली, जि. कारवाल, कर्नाटक), संजय केसराम पावरा (वय २२, रा. भोईटी, ता. शिरपूर), इराम डोंगरिया सेनानी (वय २०, रा. मोहल्या, ता. नेवाली, जि. बडवानी, मध्य प्रदेश) या तीन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्टल व राउंड जप्त केले.

सोळा तलवारी हस्तगत

विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या ११ संशयितांवर आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाई केली. त्यात अशोक धोंडू चौधरी (वय ३२, रा. वनश्री कॉलनी, म्हाडा वसाहत, घर क्रमांक ९९, मोहाडी, धुळे) याच्याकडून दोन तलवारी, मोहम्म्द हमीद रशीद (वय ३२, रा. माधवपुरा, मौलवीगंज, धुळे) एक गुप्ती, सचिन प्रकाश बागूल (वय २४, रा. मोराणे, ता. धुळे) याच्याकडून चार तलवारी, महेंद्र देवचंद मोरे (वय ३१, रा. आनंदखेडे, ता. धुळे) याच्याकडून एक तलवार, चरण प्रेमचंद नारडे (वय ३१), संजय किसनराव मोतिंगे (वय ३४, रा. सिरसगाव, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) व रमेश बजरंग गोमलाडू (वय ३३, रा. पिशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडून चार तलवारी, जट्ट्या ऊर्फ रोहिदास छगन कोळी (वय २५, रा. चैनी रोड, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) याच्याकडून एक तलवार, अमर राजू वाघमारे (वय २७, रा. बाबासाहेब आंबेडकरनगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे) व पंकज विठ्ठल गवळी (वय २१, रा. मोगलाई गवळीवाडा, धुळे) यांच्याकडून चार तलवारी, गौरी शंकर ऊर्फ गजानन सुरजमल धुर्मेकर (वय ३५, रा. सावरकर पुतळाजवळ, देवपूर) याच्याकडून एक कोयता, अशा एकूण १६ तलवारी, एक कोयता व गुप्ती हस्तगत केली.

शिरपूरला गांजा जप्त

बेकायदेशीपणे गुंगीकारक औषधी व गांजा बाळगणाऱ्या आठ जणांवर कारवाई केली. त्यात शिरपूर तालुका पोलिसांनी संशयित अब्दुलाखान कादरखान पठाण (वय २५, रा. दांडेली, जि. कारवाल, कर्नाटक), संजय केसराम पावरा (वय २२, रा. भोईटी, ता. शिरपूर), इराम डोंगरिया सेनानी (वय २०, रा. मोहल्या, ता. नेवाली, जि. बडवानी) यांच्याकडून ३० किलो गांजा जप्त केला.

त्याची किंमत दोन लाख १० हजार आहे. तसेच शिरपूर शहर पोलिसांनी संशयित गणेश नाना साबळे (वय २८), उज्ज्वला गणेश साबळे (वय २७, रा. भाऊनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, ह. मु. उगाव, ता. निफाड, जि. नाशिक), लखन भोसले (रा. महादेव दोंडवाडा, ता.शिरपूर) व राजू (पूर्ण नाव निष्पन्न नाही) यांच्याकडून ४३ हजारांचा साडेआठ किलो गांजा हस्तगत केला.

गुंगीकारक औषधी

धुळे शहर पोलिसांनी संशयित समीरखान सलीमखान (वय २०, रा. गल्ली क्रमांक ९, महेवीनगर, मालेगाव जि. नाशिक) याला ताब्यात घेत त्याच्याकडून १०९ कोरेक्स कफ सिरफ बाटल्या जप्त केल्या. त्याची किंमत ६३ हजार ५३० रुपये आहे. मोहाडी पोलिसांनी रानमळा (ता. धुळे) येथील संशयित रवींद्र दोधाजी गावडे याच्याकडून एक हजार ७३८ रुपयांचा विमल गुटखा व तंबाखूसाठा जप्त केला.

विदेशी मद्याची वाहतूक

स्थानिक गुन्हा शाखेने पिंपळनेर (ता. साक्री) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून परिसरातून होणारी विदेशी मद्याची चोरटी वाहतूक रोखली. या कारवाईत सात लाख तीन हजारांची ५२०.७१ लिटर विदेशी दारू (रॉयल चॅलेज फाईन रिर्झव्ह व्हिस्की, स्टींग बी ७ व्हिस्की, रॉयल रिस्पेक्टे व्हिस्की) व ११ लाखांची कार, असा एकूण १८ लाखांचा माल जप्त केला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मुख्य संपादक संजय चौधरी