मुक्ताईनगरच्या अपक्ष उमेदवाराला दिवसाढवळ्या घाबरवायला गेले अन् गोळीच घातली; पोलिसांनी दोघांना घेतल ताब्यात.

Spread the love

मुक्ताईनगर :- बोदवड विधानसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात असले, तरी खरा सामना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी खडसे-खेवलकर आणि विद्यमान आमदार शिंदे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यात आहे. अपक्ष उमेदवार विनोद नामदेव सोनवणे यांच्यावर प्रचार रॅलीत मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबरला अज्ञातांनी गोळीबाराच्या २ फेरी झाडून पसार झाले.

परंतु बोदवड पोलिसांना काल दोघांना अटक करण्यात यश आले असून मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहे. मंगळवारी शिरसाळा येथील जागरूक मारुती मंदिरात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅलीचा नारळ फोडून शुभारंभ झाला. त्यानंतर बोदवड तालुक्यातील राजुर गावात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असताना कारमध्ये तीन अज्ञात इसामांपैकी दोघांनी गोळीबाराच्या २ फैरी विनोद सोनवणे यांच्या कारवर झाडल्या. त्या गोळ्या कारच्या वरच्या बाजूने निघून गेल्यामुळे अपक्ष उमेदवार सोनवणे सुदैवाने थोडक्यात बचावले. या घटनेत कसलीही जीवित हानी झाली नाही, परंतु गोळीबाराच्या या घटनेने प्रचार रॅलीतील कार्यकर्त्यांमध्ये आणि राजुर गावातील ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर विनोद सोनवणे आणि त्यांचे रॅलीतील समर्थक कार्यकर्त्यांनी तडक पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची फिर्याद दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते यांनी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सदर गोळीबाराचा निषेध करून तातडीने चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस स्टेशनला जाऊन तातडीने चौकशीची मागणी केली. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारावर गोळीबाराची घटना महाराष्ट्रात पहिलीच म्हणता येईल. गोळीबाराची घटना ही निषेधार्ह तर आहेच; पण दिवसाढवळ्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत गोळीबार होतो, म्हणजे मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील गुंडगिरीने उच्चांक गाठला आहे, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात लोकशाहीच्या निवडणुकीतील उत्सवात अशा प्रकारे गुंडांनी दिवसाढवळ्या हल्ला करावा, याचा अर्थ गुंडांमध्ये कसल्याही प्रकारची भीती उरलेली नाही, असेच म्हणावे लागेल. राज्य शासनाचा तसेच राज्यातील पोलीस प्रशासनाचा धाक उरला नाही. जळगाव जिल्ह्यासारख्या शांत जिल्ह्यामध्ये उमेदवारावर गोळीबार हा उत्तर प्रदेश, बिहार राज्याची आठवण करून देणारा आहे. “आपण महाराष्ट्रातच आहोत ना?” असे वाटायला लागले आहे. त्यामुळे मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार रॅलीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये साहजिकच दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.

शांत आणि निर्भीड वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, ही सर्वांचीच अपेक्षा असते. त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य प्रशासनाची आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी हे कार्यक्षम अधिकारी आहेत. या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेऊन तशा उपाययोजना करत आहेत. त्यामुळे तातडीने दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिसरा प्रमुख आरोपी मात्र फरार आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे. तिसरा मुख्य आरोपी हाच मास्टरमाइंड असल्याचे समजते. तो फरार आरोपी भुसावळचा रहिवासी असून गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याचे समजते. अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींपैकी दीपक शेजोळे हा बोदवड तालुक्यातील येवती येथील २२ वर्षाचा तरुण असून दुसरा आरोपी आयुष उर्फ चिकू गणेश पालवे हा बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील २१ वर्षाचा तरुण आहे.

अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्याचे कारण काय? त्यामध्ये आर्थिक कारण आहे? की वैयक्तिक दुश्मनी आहे? किंवा कुणाचा यामागे हात आहे? याचा पोलिसांकडून शोध घेणे गरजेचे आहे. कारण त्यांचे नेमके कारण काय? हे कळणे आवश्यक आहे. अन्यथा विविध चर्चांना उधाण येईल. एकंदरीत मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघात उमेदवारांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन्ही तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, हे दिसून येते. त्याला आळा घालून शांतता प्रस्थापित करण्याचे काम प्रशासनाने करणे आवश्यक आहे. या दोन्ही तालुक्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात वारंवार राजकीय पक्षांकडून टीका टिपणी केली जाते. अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालण्याचा प्रशासन प्रयत्न करते, असाही आरोप केला जातो. प्रशासनावर होणारा आरोप शांतता प्रस्थापित करून पुसून काढावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी