महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे दहा दिवस शिल्लक राहिले असून यामुळे नेते मंडळींच्या प्रचार सभेला वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे मुक्कामी येणार असून १३ रोजी त्यांच्या तीन सभा होणार आहेत.जळगाव जिल्ह्यातील अकरापैकी पाच जागांवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर भाजपनेही पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. अजित पवार गटाचा एकच उमेदवार आहे. महायुतीकडून प्रचाराच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे. ज्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी त्याच पक्षाचा नेता जाहीर सभा घेणार आहे.
त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे १२ रोजी जळगाव शहरात मुक्कामी येणार आहेत. १३ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा त्यानंतर धरणगाव व एरंडोल विधानसभा मतदार संघात सभांचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फैजपूर येथे सभा होणार आहे. १० अथवा ११ रोजी ही सभा होऊ शकते. याचा निर्णय शनिवारी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी सांगितले. तर शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ११ रोजी चाळीसगाव व चोपडा येथे सभा होणार आहे.भाजपच्या दोघा बंडखोरांचे राजीनामे मंजूर
भाजपच्या उमेदवारांविरूध्द पक्षातून बंड पुकारल्यानंतर माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे व मयुर कापसे यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांविरूध्द बंडखोरी केलेल्या पाचोरा येथील अमोल शिंदे व एरंडोल मतदार संघातील माजी खासदार ए. टी. पाटलांवर कारवाईचा निर्णय न घेतल्याने महायुतीत चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान शिंदे व पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच राजीनामा दिल्याने त्यांचे राजीनामे मंजूर केले आहे. दरम्यान यांनी प्रदेश कार्यालयाकडून दोघांचे भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर राजीनामे मंजूर केल्याने कारवाईचा प्रश्नच नसल्याचे सांगितले.