एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.

Spread the love

एरंडोल :- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार
तथा माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील व अपक्ष उमेदवार भगवान पाटील यांचा ५६ हजार ३३२ मतांनी पराभव करून एकतर्फी विजय प्राप्त केला.महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना १ लाख १ हजार ८८ तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.सतीश
पाटील यांना ४४ हजार ७५६ तर अपक्ष उमेदवार भगवान पाटील यांना ४१ हजार ३९५ मते मिळाली.महायुतीचे बंडखोर उमेदवार भाजपचे माजी खासदार ए.टी.पाटील यांना केवळ १ हजार ५७६ तर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने यांना
६ हजार ३७३ मते मिळाले.मतदारसंघाची मतमोजणीस सकाळी आठ वाजता म्हसावद रस्त्यावरील दादासाहेब पाटील महाविद्यालयातील badmintan हॉलमध्ये सुरुवात करण्यात आली.पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या
फेरीपर्यंत कायम राहिली.प्रत्येक फेरीत महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचे मताधिक्य वाढतच राहिले.महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांना केवळ चौदाव्या फेरीत मताधिक्य मिळाले.डॉ.सतीश पाटील यांच्या तामसवाडी या मूळ गावात देखील महायुतीचे उमेदवार अमोल पाटील ५२१ मतांचे मताधिक्य मिळाले.महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना झालेल्या मतदानाच्या पन्नास टक्क्यांच्या वर मते मिळाल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाली.अमोल पाटील यांचे प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत असल्यामुळे सातव्या फेरीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरु केला.दहाव्या फेरीत अमोल पाटील यांना निर्णायक आघाडी मिळाल्यानंतर महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी मतदान केंद्रातून निघून गेले.वीस फे-यांची
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार मतमोजणी केंद्रात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या निवडणुकीत सामाजिक,जातीय,मतदार संघातील विकासकामे व धार्मिक या तीन मुद्द्यांवरच प्रचार केंद्रित करण्यात आला होता.महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील व अपक्ष उमेदवार भगवान पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी
घेतल्यानंतर देखील त्याचा कुठलाही प्रभाव मतदारांवर झाला नसल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या विजयात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार माजी खासदार ए.टी.पाटील केवळ दीड
हजार मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार डॉ.हर्शल माने यांना देखील केवळ ६ हजार ३७३ मते मिळाल्यामुळे त्यांचा कोणताही परिणाम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांवर झाला नाही.अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी अमोल पाटील यांचेसह पदाधिका-यांवर
जेसीबीवरून गुलालाचा व फुलांचा वर्षाव करण्यात आला.

विजयामुळे जबाबदारी वाढली आहे.-अमोल पाटील.

एरंडोल मतदारसंघात आमदार चिमणराव पाटील यांनी पाच वर्षात मतदारसंघात केलेली विकासाची कामे,महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या पदाधिका-यांनी प्रचारात घेतलेला सहभाग,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे महिलांचा मिळालेला आशीर्वाद यासह राज्य शासनाने सर्व समाजाला दिलेला न्याय या प्रमुख बाबींचा माझ्या विजयात सिंहाचा वाटा आहे.निवडणुकीत विक्रमी
मताधिक्क्याने विजय मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली असून पाच वर्षात मतदारसंघातील विकासाची घौडदौड यापेक्षा वेगाने सुरु राहील.

मतदारांचा कौल मान्य-डॉ.सतीश पाटील.

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे.निवडणुकीत पराभव झाला असला तरी आगामी काळात सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.निवडणुकीत झालेल्या पराभवाचे कारणे शोधून त्यावर
आत्मचिंतन करण्यात येईल.

मुख्य संपादक संजय चौधरी