एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प

Spread the love

एरंडोल :- 26 नोव्हेंबर रोजी एरंडोल येथे अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिवस अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला व ‘घर घर संविधान’ चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते शालिग्राम दादा गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी माननीय मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार माननीय प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक माननीय सतिष गोराडे, पोलीस उपनिरीक्षक मा. पवार साहेब, राष्ट्रवादीचे एरंडोल शहराध्यक्ष ईश्वर भाऊ बिऱ्हाडे इत्यादींची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांचे संविधानावर व्याख्यान संपन्न झाले.
भारतीय संविधान हा प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित विषय असून तरीही भारतीय संविधानाचा अभ्यास किती लोकांनी केला, असा प्रश्न वक्ते भरत शिरसाठ यांनी उपस्थित केला. आपल्या तीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी महत्वपूर्ण मुद्यांना स्पर्श केला. हक्क आणि अधिकाराची भाषा आपण करतो, परंतु संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्यांचा मात्र आम्हाला विसर पडतो. भारताला स्वातंत्र्य देण्याआधी इंग्रजांची अट होती की भारताचे संविधान तयार झाले पाहिजे. तेव्हाच आम्ही स्वातंत्र्य देऊ शकतो. 1918-19 ची साउथ बरो कमिटी, सायमन कमिशन ते तीनही गोलमेज परिषद हा भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेची पार्श्वभूमी असलेला प्रवास डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी एका तपस्वी व प्रज्ञावंत विद्यार्थ्यासारखा होता. हजारो पुस्तकांचा त्यांनी अभ्यास केला होता. तारापूर वाला बुक स्टॉलची पुस्तकांची उधारी बाबासाहेबांवर एवढी वाढली की ती उधारी चुकविण्याकरता बाबासाहेबांना आपली चारमिनार नावाची इमारत विकावी लागली. दोन वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी संविधान निर्मितीचा एक हाती किल्ला लढविला. संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी टी कृष्णमाचारी यांनी स्पष्टपणे सांगितले की संविधान मसुदा समितीमध्ये जी सात सदस्य होती, त्यापैकी एक विदेशात निघून गेले. एकाचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव एक-दोन सदस्यांनी अंग काढून घेतले. एक राजकारणामध्ये व्यस्त होते त्यामुळे त्यांना वेळ देता आला नाही. याचा सर्वस्वी परिणाम असा झाला की संविधान तयार करण्याची सर्वस्व जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांवर येऊन पडली. एखाद्या पराक्रमी योद्धा प्रमाणे त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 40,000 पुस्तके ज्यांच्या संग्रही होते आणि कोलंबिया विद्यापीठातील मागील शंभर वर्षाचा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला अशा हुशार व्यक्तीने हे भारताचे संविधान बनविले आहे म्हणून ज्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही अशा सामान्य लोकांनी संविधानाच्या संदर्भात अकलेचे तारे तोडू नयेत, असे प्रतिपादन भरत शिरसाठ यांनी आपल्या ओघवत्या भाषणात केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा भारतीय संविधान भेट देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अमर रहे ,अमर रहे- भारतीय संविधान अमर रहे, बाबासाहेबांचे संविधान -भारत देश महान इत्यादी घोषणांनी रॅलीमध्ये चैतन्य निर्माण झाले. महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करीत रॅलीचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समापन झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र गायकवाड यांनी केले. प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र तायडे, प्राध्यापक डॉक्टर संदीप कोतकर, भैय्यासाहेब सोनवणे सर, प्राध्यापक विजय गाढे, बाबुराव भगत, चिंतामण जाधव सर, भगवान ब्रह्मे, प्रविण केदार सर, सुनील खैरनार, सागर बोरसे, उषाकिरण खैरनार मॅडम, शोभा गायकवाड, वर्षा शिरसाठ, सुलोचना खोब्रागडे, मनीषा जाधव, ज्योती केदार, प्रतिभा गायकवाड, वर्षा कोतकर, वैशाली तायडे, अलका खैरनार, मीना ब्रह्मे, रमा ब्राह्मणे, निशू तामस्वरे, वैशू सोनवणे, सुनीता गायकवाड, मीना बेहरे, जयश्री अमृतसागर, सुभाष अमृतसागर सर, नितीन केदार सर, संघरत्न गायकवाड, विकीभाऊ खोकरे, कैलास गायकवाड, सुनील सोनवणे, मोहन सैदाणे, सुनित शिरसाठ, नरेंद्र सैदाणे, भैय्या अहिरे ,विजय गायकवाड, आनंद सोनवणे, गौतम केदार, शंकर शिरसाट, कवी भिमराव सोनवणे, गौतम सोनवणे, दिपक सोनवणे, दिपक सपकाळे, रविन्द्र भाऊ बोरसे, नितिन भाऊ बोरसे, सागर भाऊ बोरसे, अनिल बोडरे, मनोज बोरसे, प्रकाश भाऊ शिंदे, तुषार भाऊ सोनवने, अमोल बोरसे, जितेंद्र भाऊ ह्याडींगळे, अमोल शिंदे, सुमित बोरसे, अभिषेक भाऊ शिंदे, रोहीत गायकवाड, विनोद सरदार, मय्युर अहीरे, उमेश बोरसे, रघुनाथ सपकाळे, मुकेश ब्राम्हणे, तसेच शेकडोच्या संख्येने संविधान प्रेमी बहुजन समाजातील लोक, महिला व बालक उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी