भोपाळ :- बनावट एडिशनल एसपी असल्याचं खोट सांगून एका महिलेने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळ पोलीस ठाण्यात जाऊन तिने इतर अधिकाऱ्यांना आपला धाक दाखवला. शिवानी चौहान असं नाव असल्याचं सांगितलं.तिला पाहताच पोलीस ठाण्याच्या इंचार्जनेही जय हिंद म्हणत महिलेला सॅल्यूट मारला. पण नंतर जे बोलणं झालं त्यामध्ये महिलेची एक चूक झाली आणि ती पकडली गेली. एएसपीचा यूनिफॉर्म परिधान करून पोलिसांना त्रास देणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झाला.
महिला पोलिसांनीच बनावट महिला एडिशनल एसपीला पकडलं आहे. बनावट पोलीस अधिकारी बनलेल्या महिलेला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती एडिशनल एसपीच्या यूनिफॉर्ममध्ये टीटी नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती. ती पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला आपण अधिकारी असल्याचं सांगायची.
पोलीस ठाण्याचे टीआय आणि एसीपी तिला सॅल्यूट करायचे. महिलेने ती २०१८ च्या बॅचमधील असल्याचं सांगितलं. या बॅचला अद्याप प्रमोशन देण्यात आलेलं नाही. हे अधिकाऱ्यांना माहीत होतं त्यामुळेच महिलेची सर्वांसमोर पोलखोल झाली. आईची तब्येत खूप खराब आहे. तिला खूश करण्यासाठी पोलीस खात्यात काम करत असल्याचं खोटं सांगितलं अशी माहिती महिलेने दिली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीत शिवानीने सांगितलं की, तिने इंदूरमधील पोलीस कॅन्टीनसमोर असलेल्या दुकानातून पोलिसांचा युनिफॉर्म, बेल्ट आणि शूज खरेदी केले होते. तिला तेथून एक बिल्लाही मिळाला. एडिशनल एसपीचा गणवेश कसा दिसतो, त्यावर अशोक चिन्ह आणि स्टार आहेत आणि ते कसं लावलं जातं, हे सर्व ती यूट्यूबवर पाहून शिकली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.