भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेश पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि मेहुणीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.आरोपीने हत्या केल्यानंतर फरार झाला आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मध्य प्रदेश पोलिस दलातील अधिकारी एएसआय योगेश मरावी सध्या मंडला येथे सेवेत आहे. योगेश यांची पत्नी विनिता ही भोपाळमध्ये नोकरी करत होती. ती ऐशबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात पेट्रोल पंप परिसरात बहिणीसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती. योगेश याचा मागच्या काही काळापासून पत्नीसोबत वाद सुरू होता.
सोमवारी नेहमी प्रमाणे घरात घरकाम करणारी महिला आली. तेव्हा विनिता हिने तिला घरात घेण्यासाठी दरवाजा उघडला. तेवढ्यात योगेश हा सुद्धा तिथे आला. यावेळी योगेश आणि विनिता यांच्यात वाद सुरू झाला. त्यादरम्यान संतापलेल्या योगेश याने विनितावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या विनिती हिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून विनिताची बहीण तिला वाचवण्यासाठी आली. मात्र योगेशने तिच्यावरही चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या विनित आणि तिच्या बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, मृत महिलांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर ऐशबाग पोलिस ठाण्यातील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस आयुक्त हरिनारायणचारी मिश्र यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.