सहा तासातंच प्रियकरास अटक, पतीवर अंत्यसंस्कार झाल्यावर पत्नीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
अमळनेर :- तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. तुषार चिंधू चौधरी (वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु.प्रताप मिल, अमळनेर) असे मयत पतीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलिसांनी अटक केलीय.
या घटनेबाबत असे की, अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पुजा, २ मुलांसह वास्तव्याला होता. गुरूवारी दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला, यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निर्घृण खून करून पसार झाला होता.तुषारचा मृतदेह आज शुक्रवारी अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यात तुषार चौधरी याच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून दोंडाईचाजवळच्या मालपूर येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली.
त्यामुळे पोलीसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिलादेखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे चुलतभाऊ मधुकर धुडकु चौधरी (वय ५५, रा. मारवड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्ना अगोदरच प्रेमप्रकरण
तुषारला दोन मुलं आहेत. तो पत्नी पूजासह राहत होता. पूजाचे सागर चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण होतं. सागर हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा राहणारा आहे. सागर अनेकवेळा अमळनेरला येऊन पूजाला घेऊन बाहेर जात होता. विशेष म्हणजे सागरचं लग्न झालेलं आहे. त्याला एक मुलगी आहे. पण त्याची बायको त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे त्याने पूजाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजाही लग्नाला तयार झाली होती. पण तुषार हा आपल्यात अडथळा बनेल म्हणून त्याने तुषारचा काटा काढायचा निर्णय घेतला. पूजा मात्र सागरला मारू नको असं सांगत होती. तरीही सागर निर्णयावर ठाम होता. पूजाने तुषारला बोलावून घेतलं होतं. माझा नातेवाईक येत आहे. त्याच्यासोबत लग्नाची पत्रिका वाटायला जा, असं तिने तुषारला सांगितलं. त्यानंतर सागर आला आणि तो तुषार सोबत गेला. दोघेही दारू प्यायले. त्यानंतर दोघे मंगरुळला गेले. तिकडे गेल्यावर सागरने तुषारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सहा तासातच लावला तपास
पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोबाईल फोन, लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपसले. त्यानंतर एक पथक दोंडाईचा येथे पाठवले. सागरने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्याचे मोबाईलचे दुकान होते. पण हत्येनंतर अवघ्या सहा तासातच पोलिसांनी त्याच्यावर त्याला अटक केली. तुषारची अंत्ययात्रा झाल्यावर पोलिसांनी पूजालाही ताब्यात घेतलं. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.