नंदुरबार :- शहरातील होळ शिवार परिसरात असलेल्या जगतापवाडी जवळील द्वारका नगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.दरम्यान हे दोन्ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार शहरातील पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल होती.
राजेश्वरी चंद्रसिंग पावरा (वय ७) व शंकर पावरा (वय ५) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बहीण भावाची नावे आहेत. दरम्यान नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात असलेल्या द्वारका नगर या भागात नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी वॉचमन म्हणून काम करणाऱ्या राखलदाराची हि दोन्ही मुले आहेत. दोन मुलांचा बांधकाम सुरू असलेल्या घराच्या पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
दोन दिवसांपासून होते बेपत्ता
दरम्यान दोन्ही भाऊ- बहीण काल सकाळपासून बेपत्ता होती. यामुळे शहर पोलीसात मुले मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरून पोलीसांकडून मुलांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान आज सकाळी घराच्या बांधकामाठिकाणी आलेल्या कामगारांना पाण्याच्या टाकीतच या मुलांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. तर घटना उघड झाल्यानंतर मयत मुलांच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचे देखील डोळे पाणवले होते. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस. हे घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी आले. दोघी मुलांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवइच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. खेळताना पाय घासरुन पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.