बंगळुरु :- (कर्नाटक) एका महिलेला तिच्या प्रियकरावर विश्वास ठेवणे महागात पडलं आहे. बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रियसीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून अडीच कोटी रुपये उकळले आहेत.प्रियकराने मुलीसोबत इंटिमेट व्हिडिओ बनवले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल केले. अनेक महिने हे ब्लॅकमेलिंग सुरूच होते. या दरम्यान त्याने तरुणीचे दागिने, महागडी घड्याळे आणि महागडी कार हिसकावून घेतली. भीतीपोटी मुलीने अडीच कोटी रुपये आणि दागिने, महागडी घड्याळे आणि एक महागडी कारही प्रियकराला दिली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर आता पोलिसांकडून खंडणीच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन कुमार असे आरोपीचे नाव आहे. पीडितेला ब्लॅकमेल करण्यापूर्वी तो तिच्याशी संबंधात होता. दोघांनी एकत्र बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले, परंतु पदवीनंतर त्यांचा संपर्क तुटला. काही वर्षांनी ते एकमेकांशी पुन्हा एकत्र आले आणि डेटिंग करू लागले. कुमारने शेवटी त्या तरुणीला लग्न करण्याचे वचन दिले आणि तिला आपल्यासोबत बाहेर नेले. यानंतर त्याने तरुणीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढले. आपण हे सर्व केवळ स्वत:साठी करत असल्याची ग्वाहीही त्याने तरुणीला दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक व्हिडिओंमध्ये मोहनचा चेहरा दिसणार नसल्याची काळजी घेण्यात आली होती. त्यानंतर कुमारने तरुणीला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. आपले खासगी फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक होतील या भीतीने तरुणीने मोहन कुमारला काही महिन्यांत २.५७ कोटी रुपये दिले. मोठी रक्कम न दिल्यास व्हिडिओ अपलोड करू, अशी धमकीही त्याने दिली. यामुळे घाबरलेल्या मुलीने आजीच्या बँक खात्यातून १.२५ कोटी रुपये काढले. नंतर हे पैसे मोहनने दिलेल्या काही खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
त्यानंतर तरुणीने मोहनला सुमारे १.३२ कोटी रुपये रोख दिले. मात्र, मोहनच्या मागण्या इथेच संपल्या नाहीत. त्याने तरुणीकडून महागडी घड्याळे, दागिने आणि आलिशान कार घेतली. अनेकवेळा त्याने त्याच्या वडिलांच्या खात्यात पैसेही ट्रान्सफर करुन घेतले. मोहन कुमार सातत्याने पैशांची मागणी करत असताना पीडित मुलीने हिंमत दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मोहनला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपींनी अंदाजे २.५७ कोटी रुपये उकळले असून त्यापैकी ८० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.