टाटा आयपीएल – गुजरात टायटन्स ८ गुणांसह अव्वल

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा चोवीसावा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगला. एकतर्फी झालेल्या ह्या सामन्यात गुजरात टायटन्सने ३७ धावांनी जिंकला आणि गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर धडक मारली. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गुजरात टायटन्सचे मॅथ्यू वेड, विजय शंकर आणि शुबमन गील स्वस्तात बाद झाले. कर्णधार हार्दिक पांड्याने अभिनव मनोहरच्या जोडीने धावसंख्या वाढवण्यास सुरूवात केली. पण यझुवेंद्र चहलने ही जोडी फोडली. मनोहरने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने केवळ २८ चेंडूंत ४३ धावा काढल्या. त्याच्याजागी आलेल्या डेव्हिड मिलरने राजस्थानच्या गोलंदाजांचा येथेच्छ समाचार घेतला. २०व्या षटकांच्या अखेरीस हार्दिकने ८ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने केवळ ५२ चेंडूंत बिनबाद ८७ धावा काढल्या. तर मिलरने ५ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने केवळ १४ चेंडूंत बिनबाद ३१ धावा काढल्या. गुजरातने १९२/४ धावांचा डोंगर उभा केला.

राजस्थान रॉयल्सकडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल उतरले. बटलरच्या टप्प्यात चेंडू येत होता आणि तो धावा वसूल करत होता. दुसर्‍या षटकाच्या शेवटचा चेंडू आणि आजच्या सामन्यातला पहिला चेंडू खेळण्यासाठी देवदत्त समोर आला आणि यश दयालने त्याला शून्यावर बाद केले. त्याच्याजागी आलेला रवीचंद्रन अश्विन झटपट बाद झाला. त्याच षटकात लॉकी फर्ग्युसनने जोस बटलरचा अडथळाही दूर केला. बटलरने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने केवळ २४ चेंडूंत ५४ धावा काढल्या. कर्णधार संजू सॅमसनला कर्णधार हार्दिक पांड्याने धावबाद केले. आर. दुस्सेन स्वस्तात बाद झाला. शिमरॉन हेटमेयरने चांगले फटके मारून २९ धावा काढल्या. पण मोहम्मद सामीने त्याला बाद केले. रियान परागला लॉकी फर्ग्युसनने १८ धावांवर बाद केले. जेम्स निशामला स्वतःच्याच गोलंदाजीवर कर्णधार हार्दिक पांड्याने १७ धावांवर टिपले. यझुवेंद्र चहलला केवळ ५ धावांवर यश दयालने तंबूचा रस्ता दाखवला. २०व्या षटकांच्या अखेरीस राजस्थान रॉयल्स १५५/९ इतकीच मजल मारू शकला. एकतर्फी झालेल्या ह्या सामन्यात गुजरात टायटन्सने तीनही क्षेत्रांमध्ये राजस्थानवर मात केली आणि हक्काचा विजय मिळवला.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना बिनबाद ८७ धावा काढल्या होत्या. तर गोलंदाजी करताना १/१८ असं योगदान दिलं होतं.
उद्याचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. कोलकाता विजयासह गुणतक्त्यात दुसर्‍या क्रमांकावर आपलं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. हैदराबादचा संघ काय डावपेच योजतो त्यावर सामन्याचा निकाल ठरेल.

टीम झुंजार