मुरादाबाद (उत्तर प्रदेश) :- मधून एक अजब घटना समोर आली आहे. एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीने तिहेरी तलाक दिला आहे. पतीने पत्नीला तलाख देण्यामागील कारणही खूप धक्कादायक आहे.महिला संभल हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ पाहत असल्याचे पाहून पती संतापला आणि त्याने पत्नीला घटस्फोट दिला. पतीने पत्नीला काफिर म्हणत तिहेरी तलाक दिल्याचे म्हटलं जात आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पीडित महिलेला तिच्या पतीने संभल हिंसाचारात पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केल्यामुळे तिहेरी तलाक दिला आहे. पत्नीच्या या मतावर पती इतका संतापला की त्याने तिला तिहेरी तलाक दिला आणि सांगितले की ती पोलिसांचे समर्थन करते आणि मुस्लिमांना विरोध करते, म्हणून तो तिला घरात ठेवणार नाही. या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. ही घटना मुरादाबादच्या कटघर पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, तिला तीन मुले आहेत.
पीडित महिलेने सांगितले की, ती संभल येथे एका लग्नाला जात होती, त्यामुळे तिथले वातावरण व्हिडीओमध्ये पाहत होती. पतीला तिहेरी तलाक दिल्यानंतर पीडित महिलेने सांगितले की, “मी यूट्यूबवर संभल हिंसाचाराचा व्हिडिओ पाहत होती. त्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीला सांगितले की, हे चुकीचे होत आहे. सर्वांनीच स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. मी ती गोष्ट बोलत होती तेव्हा कोणाचे समर्थन करत नव्हती. पण माझ्या पतीने काहीही न बोलता मला तिहेरी तलाक दिला.”
२०२१ मध्ये पहिल्या पतीच्या निधनानंतर पीडित महिलेची शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीशी जवळीक वाढली. त्यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि नंतर तिच्यासोबत गुरुग्राममध्ये राहू लागला. सुरुवातीला लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने नकार दिला पण नंतर पोलिसांच्या दबावाखाली त्याने लग्न केले. लग्न झाल्यापासून तो तिच्यावर रागावला होता असं महिलेने सांगितले. पण संभल हिंसाचाराच्या संदर्भात तिने पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केल्यावर तो आणखी संतापले आणि त्याला संधी मिळाली. यानंतर तिच्या पतीने किरकोळ कारणावरून तिला तिहेरी तलाक दिला.
नेमकं काय घडलं?
“संभल येथे एक लग्न होते आणि मला काही कामासाठी तिथे जायचे होते. त्यामुळे तिथे जाण्यापूर्वी मी त्या ठिकाणचे व्हिडिओ पाहून परिस्थिती बघत होते. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी म्हटलं की दोघांनीही हे करू नये. त्या लोकांसोबत जे काही घडलं ते पाहून मला दु:ख झालं पण त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही केलं असेल तर कोणीही स्वतःचा बचाव करू शकतो, प्रत्येकाचा अधिकार आहे. मी कोणाचेही समर्थन करत नव्हती. एवढ्या साध्या गोष्टीवर तो म्हणाला, तू मुस्लिम नाहीस, काफिर आहेस, पोलिसांना साथ देतोस. माझे पती खूप उद्धटपणे बोलत होते. मला म्हणाले की मी तुला ठेवणार नाही आणि मला तलाक दिला आणि सांगितले की तुझा माझ्याशी काहीही संबंध नाही,” असं पीडित महिलेने सांगितले.