अनैतिक संबंधातून बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा ओढनीने गळा आवळून केला खुन;मृतदेह जंगलात पुरला.

Oplus_131072
Spread the love

नागपूर :- चंद्रपूर पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने अनैतिक संबंधातून एका महिलेचा ओढनीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळील जंगलात पुरला.त्या पोलीस कर्मचाऱ्याला चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. नरेंद्र डाहुळे असे आरोपीचे नाव असून अरुणा काकडे (३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणा अभय काकडे या चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर येथील रहिवासी आहेत. महिलेचे चंद्रपुरात देवांश जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. त्या दुकानासाठी सौंदर्यप्रसाधने विकत घेण्यासाठी त्या २६ नोव्हेंबरला नागपुरात आल्या होत्या. तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीबाग येथील नंगापुतळा परिसरात पोहचल्या. दुपारी १२ वाजता अरुणा यांनी पतीला फोन करुन नागपुरात पोहचल्याची माहिती दिली. त्यानंतर महिलेचा फोन बंद झाला.

सायंकाळपर्यंत पत्नी घरी न परतल्यामुळे तिच्या पतीने वारंवार तिला फोन केला. मात्र, फोन बंद असल्यामुळे त्याला काळजी वाटली. त्यांनी अरुणाची नातेवाईकांच्या मदतीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. तिच्या पतीने शेवटी चिमूर पोलीस ठाण्यात पत्नी हरविल्यासंदर्भात तक्रार दाखल केली. नागपुरातील नंगापुतळा परिसरातून महिला बेपत्ता झाल्यामुळे तहसील पोलिसांनी त्या तक्रारीचा समांतर तपास सुरु केला.

शेवटी चंद्रपूर पोलीस दलातील सायबर सेलने तांत्रिक तपास करीत महिलेचा ‘सीडीआर’ काढला. त्यात चंद्रपूर पोलीस दलातून बडतर्फ झालेला पोलीस कर्मचारी नरेंद्र डाहुळे यांच्यावर संशय आला. त्याला नुकताच चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. अरुणा काकडे हिच्या बेपत्ता होण्यामागे त्याची भूमिका संशयास्पद वाटली. त्यामुळे त्याला पोलिसांनी चांगला पाहुणचार दिला.

त्यानंतर त्याने सांगितले की, ‘अरुणाचा मी गळा आवळून खून केला. गांधीबाग परिसरात कारमध्ये ओढणीने गळा आवळला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नागपुरातील काही भागात कारने फिरलो. मात्र, कुणाला दिसण्याची भीती होती. त्यामुळे मी तिचा मृतदेह कारमध्ये घालून बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळील जंगलात गेलो. तेथे अरुणाचा मृतदेह पुरला’ अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे त्याला चंद्रपूर पोलिसांनी नागपुरात आणले. त्याने अरुणाचा मृतदेह पुरल्याची जागा दाखवली.

चंद्रपूर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे. अरुणाचा खून करण्यामागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांनी दिली.

मुख्य संपादक संजय चौधरी