दिल्ली :- पश्चिम दिल्लीतील ख्याला भागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर, आरोपी मुलाने स्वतः पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.पण त्याच्या संशयास्पद हालचालीत तो पोलिसांना सापडला, त्यामुळे आईची हत्या केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली.
6 डिसेंबरच्या सायंकाळी, रात्री साडेआठ वाजता सावर नावाच्या व्यक्तीने ख्याला पोलीस ठाण्यात फोन केला. त्याने सांगितले की, कोणीतरी त्याच्या आईची हत्या केली असून तिच्या कानातील दागिने लंपास केले आहेत. घटनास्थळी पोहोचल्यावर, घराच्या परिस्थितीतून चोरीचा कोणताही पुरावा मिळाला नाही. घरातील वस्तू विखुरलेल्या नव्हत्या आणि महत्त्वाच्या गोष्टी गायब झालेल्या नव्हत्या.मृत महिला सुलोचना (45) यांच्या पतीचे 2019 साली निधन झाले होते. त्या आपल्या दोन अविवाहित मुलांसोबत राहत होत्या. तपासादरम्यान, पोलिसांनी दोन्ही मुलांशी आणि शेजाऱ्यांशी चौकशी केली. लवकरच पोलिसांचा संशय सुलोचनांच्या लहान मुलगा सावरकडे वळला. सुरुवातीला सावरने खोटी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या प्रश्नांपुढे तो टिकू शकला नाही आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला.
सावरच्या मोठ्या भावाचा लग्न ठरलेलं होतं. घरात लग्नाच्या तयारीचा माहोल पाहून, सावरने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा आईसमोर मांडली. मात्र, आईला हे मान्य नव्हते. त्यावरून तिने सावरला रागावले आणि वारंवार याबाबत बोलल्यास त्याला तिच्या संपत्तीत काहीच मिळणार नाही, असे सांगितले. आईच्या या शब्दांवर संतापून सावरने तिचा गळा आवळून ठार मारले. हत्येनंतर, त्याने चोरीची खोटी गोष्ट बनवली आणि पोलिसांना फोन केला.पोलिसांनी घटनास्थळाचा तपास करून आणि शेजाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर सावरची गोष्ट फोल ठरवली. हत्येचा गुन्हा कबूल केल्यावर, सावरला अटक करण्यात आली. ही घटना मुला-मुलींच्या पालकांशी असलेल्या नात्याच्या गुंतागुंतीला आणि संतापाने घडणाऱ्या गुन्ह्यांना अधोरेखित करते.