किशनगंज (बिहार) :- संस्थेत काम करणाऱ्या महिलेनं तिच्या ऑफिसमधील पुरुष सहकाऱ्याविरूद्ध पोलीस तक्रार दिली आहे. ही व्यक्ती नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण करत होती, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, संस्थेत माझ्यासोबत काम करणारा सहकारी तरुण माझं लैंगिक शोषण करत आहे. मी जर त्याला विरोध केला तर तो माझ्या कामातील चुका काढतो. मग नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतो.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी महिला पोलीस स्टेशनच्या प्रमुख सुनीता कुमारी यांनी सांगितलं की, पीडित महिलेच्या जबाबाआधारे एफआयआर नोंदवला आहे. तसंच प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
बिहारच्या किशनगंज येथील एका संस्थेत हा प्रकार घडला आहे.
एफआयआरनुसार, पीडित महिला उपजिविकेसाठी एका संस्थेत नोकरी करत होती. त्या संस्थेत ढेकसारा येथील रहिवासी समीर कुमार बैठा या तरुणाशी तिची ओळख झाली. समीर कुमार या संस्थेत बुक कीपर पदावर कार्यरत आहे. तो महिलेच्या कामात छोट्या-छोट्या चुका काढत होता. नोकरी वाचवण्यासाठी पीडित महिलेला त्याचे ऐकून घ्यावे लागत होते. तो कर्मचारी तरुणीकडे वाईट नजरेनं पाहत होता, असा देखील आरोप आहे. पीडित महिलेनं सांगितलं की, मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल, नाहीतर तुला नोकरी गमवावी लागेल. नोकरी वाचवायची असेल तर मला खूश करत राहा, असं म्हणायचा. साडेचार वर्षांपूर्वी 2020 मध्ये तो मला फूस लावून त्याच्या भाडेतत्त्वावरील घरी घेऊन गेला होता. तिथे त्याने माझ्याशी दुष्कृत्य केलं होतं. विरोध केला असता नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तो सातत्याने माझं लैंगिक शोषण करू लागला.
एफआयआरनुसार, काही दिवसांत पीडित महिला गर्भवती राहिली. तिला त्याने गर्भपाताचे औषध पाजले. पीडितेनं सांगितलं की, लोकांमध्ये मानहानी टाळण्यासाठी मी कुटुंबियांपासून ही माहिती लपवून ठेवली. पण त्यानंतर माझा संयम सुटला आणि न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
सध्या पोलीस तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.