नेवासा: नगर – औरंगाबाद महामार्गावर दोन टेम्पोच्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नेवासा परिसरातील प्रवरासंगम शिवारातील हाॅटेल हिंदुस्थान जवळ गुरुवारी रात्री 10.30 वाजता घडली. सचिन बाळासाहेब कडू (वय 21, रा. खलालपिंप्री), नामदेव जाधव (वय 57 रा. गणेशवाडी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिरवाडी (ता. नेवासा) येथील यात्रेनिमित्त कावडीने पाणी आणण्यासाठी प्रवरासंगमच्या दिशेने चाललेल्या दोन युवकांना हाॅटेल हिंदुस्थान समोर पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात कावडधारी युवक सचिन कडू हा जागीच ठार झाला. तर अक्षय आढागळे हा युवक किरकोळ जखमी झाला.
टेम्पोने दोघांना धडक दिल्यानंतर दुसऱ्यांना वाचविण्यासाठी नगरकडून – औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने रस्त्याचे दुभाजक तोडून समोरून नगरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला जोराची धडक दिली. यात टेम्पोचालक नामदेव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा टेम्पोचालक पुंडलिक दहिफळे जखमी झाला आहे.
अपघाताचे वृत्त समजतात नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरासंगम दुरक्षेत्र चौकीचे पोलिस हवालदार ससाणे यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारुन जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच जखमीचे निधन झाल्यामुळे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत नेवासा पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.