जून्नर :- वारूळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डावा कालव्यात उच्चशिक्षित दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यापैकी चिराग शेळके याचा मृतदेह कालव्यातून काढण्यात बुधवारी यश आले, तर पल्लवी शेळके यांचा गुरुवारी मृतदेह मिळून आला. या दाम्पत्याने अंतर्गत वादातून आत्महत्या केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. या घटनेने नारायणगाव व वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दाम्पत्याचा नुकताच विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. या शिक्षक दांपत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.
चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते.ते विद्यार्थी प्रिय शिक्षक,नाट्य लेखक, कवी सुद्धा होते. त्यांनी लेखन केलेल्या नाटकाचा शालेय जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. ते अतिशय संवेदनशील, शिस्तप्रिय शिक्षक असल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिली. त्यांच्या पत्नी प्रा.पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता.ते वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील अभंग वस्तीत राहत होते. चिराग, त्याची आई व पत्नी असे त्रिकोणी कुटुंब होते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व प्रा.पल्लवी हे दुचाकी वरून येथील वारूळवाडी – ठाकरवाडी रस्त्यावरील डिंभे डावा कालव्यावरील पुलावर आले होते. त्यांनी दुचाकी पुलावर उभी केली.या वेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणातच ते दिसेनासे झाले.शिक्षक दाम्पत्याने कालव्यात उडी मारल्याची माहिती वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिली.चिराग शेळके यांचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात यश आले. मात्र अंधार पडल्याने प्रा.पल्लवी यांचा शोध घेता आला नाही.
दरम्यान कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी डिंभे डावा कालव्यातील पाणी कमी केले. गुरुवारी सकाळी नऊ वाण्याच्या सुमारास प्रा.पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. दुपारी दोघांच्या मृतदेहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीप्ती कळबकर यांच्या उपस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.