नागपूर :- इंजिनिअरींग करणाऱ्या मुलानं स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केली. ही घटना नागपुरातील कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. हत्येच्या सहा दिवसानंतर घटना उघडकीस आली.पण, शिक्षण घेणाऱ्या मुलानं आपल्या आई-वडिलांना का संपवलं?ही घटना कशी समोर आली? आणि आई-वडिलांची हत्या करण्याचं पाऊल उचलण्याइतपत मुलं हिंसक का होत आहेत? त्यांचा अहंकार इतका लगेच का दुखावतो? पाहुयात.लिलाधर डाखुळे (वय 50) आणि अरुणा लिलाधर डाखुळे (वय 42) अशी हत्या झालेल्या आई-वडिलांची नावे असून उत्कर्ष डाखुळे (वय 24) असं आरोपी मुलाचं नाव आहे.
क्रूरपणे दोघांची केली हत्या
नागपुरातील झोन 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, लिलाधर हे कोराडी पॉवर प्लांटमध्ये नोकरीला होते, तर त्यांच्या पत्नी अरुणा शिक्षिका होत्या. अरुणा 26 डिसेंबरला घरात एकट्या असताना मुलगा उत्कर्षनं बेडरुममध्ये आईची गळा दाबून हत्या केली. बेडरुमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तो वडिलांची वाट पाहत बसला. नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेलेले वडील सायंकाळच्या सुमारास घरी परतले. वडील बाथरूममध्ये गेले असता तर त्यानं वडिलांच्या खांद्यावर चाकूने तीन वार केले. त्यानंतरही वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. ‘आपण बसून बोलू, काय झालं तुला?’, असं म्हणत शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘तुझ्या आईला बोलावं, आपण सगळे मिळून मार्ग काढू,’ असं वडील म्हणाले. पण, आईला आपण आधीच मारल्याचं उत्कर्षनं वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडील हादरले. त्यानं वडिलांना पुन्हा चाकूनं भोसकलं. यामध्ये वडिलांचाही जागीच मृत्यू झाला.
आई-वडील मेडिटेशनला गेल्याचा केला बनाव
इतक्यात बीएएमएस करत असलेल्या बहिणीची कॉलेजमधून घरी यायची वेळ झाली होती. तिला हे सगळं कळणार, या भीतीनं त्यानं घराला कुलूप लावून वडिलांचा फोन बंद केला आणि स्वतःजवळ ठेवला. चारचाकी गाडी घेऊन तो बहिणीला घ्यायला गेला. आई-बाबा अचानक मेडिटेशनसाठी बंगळुरूला गेले आहेत. त्यामुळे आपल्याला बैलवाडाला काकांकडं राहायला जायला सांगितलं, असं त्यानं बहिणीला सांगितलं. पण, बहिणीचा विश्वास बसत नव्हता. बहिणीनं आई-बाबांच्या मोबाईलवर फोन केला. पण, वडिलांचा मोबाईल बंद येत होता, तर आईच्या मोबाईलवरून कोणी उत्तर देत नव्हतं. त्यामुळे मुलीलाही चिंता वाटत होती.
बहीण सतत आई-बाबांबद्दल बोलत असल्यानं त्यानं वडिलांचा मोबाईल सुरू केला आणि बहिणीला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला. आम्ही बंगळुरूला मेडिटेशनसाठी आलो असून 5 जानेवारीपर्यंत नागपुरात परत येऊ, असा मेसेज त्यानं केल्यानं बहिणीचाही विश्वास बसला.
हत्येला 4 दिवस उलटले तरी तो बहिणीला घेऊन काकांच्या घरी राहत होता.
हत्या झाल्याचं कसं समोर आलं?
लिलाधार डाखुळे यांना आणखी तीन भावंड आहेत. दोघे त्यांच्या घराच्या शेजारी नागपुरात राहतात, तर एक बैलवाडा इथं राहतात. घराशेजारी राहणाऱ्या भावांना तसेच शेजाऱ्यांना डाखुळे यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे उत्कर्षच्या चुलत भावांनी त्याला फोन करून घरातून कसलीतरी दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर उत्कर्ष 31 डिसेंबरला लगेच आला आणि आई-बाबांची आठवण येत आहे असं सांगून भावांजवळ खूप रडू लागला. मला आई-बाबांबद्दल वाईट स्वप्नं पडत आहेत. त्यांना काही झालं तर नसेल ना, आपण दरवाजा उघडू असं म्हणत त्यानं रात्रीच दरवाजा उघडायला लावला. एकानं पोलिसांना फोन करून कळवलं. पण, पोलीस पोहोचायच्या आधीच त्यांनी दरवाजा उघडला होता. इतक्यात आरोपी उत्कर्षनं त्याच्याकडे असलेला वडिलांचा मोबाईल तिथंच घरात टेबलवर ठेवला आणि वडिलांनी आत्महत्या केली असेल असा बनाव रचला.
मोबाईलमध्ये लिहून ठेवली सुसाईड नोट
वडिलांचा मोबाईल आरोपी उत्कर्षकडे होता. त्यानं वडिलांच्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट लिहिली होती. “बाळांनो आम्हाला मिस करू नका. सॉरी आम्ही हे पाऊल उचलतोय. पोलिसांत तक्रार करू नका. आम्हाला थेट स्मशानभूमीत घेऊन जा”, असं लिहून त्याचा स्क्रीनशॉट काढून तो मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवला होता. पण, या सुसाईड नोटवरून काहीच स्पष्ट होत नव्हतं. तसेच आई-बाबा बंगळुरूला गेले असं तोच सगळ्यांना सांगत होता. त्यामुळे प्राथमिक संशयित मुलगा उत्कर्षच होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन कपिल नगर पोलिसांत नेलं. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं. पण, नंतर कसून चौकशी केल्यानंतर त्यानं हत्या केल्याचं कबुल केलं, अशी माहिती निकेतन कदम यांनी दिली.
वाद झाल्याचं कारण
पण, इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या मुलानं आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना का मारलं? याबद्दल पोलिस उपायुक्त निकेतन कदम सांगतात, उत्कर्ष 6 वर्षांपासून इंजिनिअरिंग करत होता. पण, तो सातत्यानं नापास व्हायचा. मुलाला इंजिनिअरिंग जमत नाही. त्यामुळे आता त्यानं दुसऱ्या क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि घरची शेती आहे तिकडे लक्ष द्यावं असं आई-वडिलांनी ठरवलं. पण, उत्कर्ष ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. या गोष्टीवरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होते. 25 डिसेंबरलाही यावरूनच वाद झाला.उत्कर्षला शेती करायला बैलवाडा इथं पाठवायचं ठरलं होतं. त्यामुळे कडाक्याचं भांडण झालं होतं. त्याला शेती करायला जायचं नव्हतं. त्यानंतर उत्कर्षनं चाकू विकत घेतला आणि बहीण कॉलेजला निघून गेल्यानंतर आईला संपवलं.
त्यानंतर वडिलांनाही चाकूनं भोसकलं. वडिलांवर दोन तीन वार केल्यानंतर वडिलांनी बसून निर्णय घेऊ असं म्हणत, त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही तुम्ही मला अजूनही बैलवाड्याला पाठवणार आहात का? असं विचारलं. तेव्हा वडील म्हणाले, हो आपलं ठरलं ते ठरलं. त्यानंतर उत्कर्षनं वडिलांचा जीव घेतला. मुलगा घरात लाडाचा होता. त्याला जे पाहिजे ते मिळत होतं. त्याच्या सगळ्या इच्छा आई-बाबांनी पूर्ण केल्या होत्या. आई-बाबांनी कधीच त्याला मारलं नाही, असं आरोपी उत्कर्षच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं. पण, 25 तारखेला झालेल्या भांडणात वडिलांनी मारल्याचा दावा आरोपी उत्कर्षनं केलाय.