
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक प्रचारात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास आपण हिमालयात जाणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, आता पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या त्याच वाक्याचा आधार घेत महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांचे ‘हिमालय की गोद मे’ असे नमूद करत पोस्टर झळकावले आहे.
कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यातच महाविकास आघाडीकडूनही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असले तरी पुण्यातून निवडून गेले असल्याचा मुद्दा या निवडणुकीदरम्यान समोर आणण्यात आला होता. त्यानंतर कोल्हापूरमधील ही पोटनिवडणूक जिंकू अथवा हिमालयात जाऊ, हे आव्हान असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत म्हटले होते.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान, कोल्हापुर चंद्रकांत पाटील यांना मंगळवार पेठेतून बाहेर पडताना हिमालयात जा असे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी बाहेर जाण्यास भाग पाडले होते. आजच्या पोटनिवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी ‘हिमालय की गोद मे’ असे नमूद करत चंद्रकांत पाटील यांचे पोस्टर झळकावले.
युवक काँग्रेसनेदेखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पोस्टर झळकावले. चंद्रकांत पाटील हिमालयात फरार झाले असल्याचे पोस्टर युवक काँग्रेसने झळकावले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे.