सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरामध्ये एका रुपयात एक लीटर दराने पेट्रोल वितरीत करण्यात आले. इकीकडे दिवसेंदिवस महागाईने सामान्य जनतेला फटका सहन करावा लागतोय तर दुसरीकडे सोलापुरातील नागरिकांना पेट्रोल एक रुपये लीटरने दिलं जाणार आहे. या अनोख्या मोहीमेमुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जातोय.
सोलापूरकरांना आज दिवसभर या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आयोजक राहुल सर्वगोड यांनी म्हटलं आहे. जवळपास ५०० लिटरपर्यंत पेट्रोल या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. “आज इंधनाचे दर ११० रुपयांपर्यंत गेलेत. मोदी सरकारचा निषेध आणि बाबासाहेब जंयतीनिमित्त आम्ही हा छोटासा उपक्रम राबवत आहोत,” असं राहुल सर्वगोड म्हणाले आहेत.
प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या धोरणानुसार पहिल्या ५०० लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. मात्र केवळ ५०० जणांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याने दुपारपर्यंतच ही मर्यादा संपून जाईल अशी शक्यता योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून व्यक्त केली जातेय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी दिसून येत आहे. एक रुपये लिटर दराने पेट्रोल भरुन घेण्यासाठी अनेकांनी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसून आलं.