नाशिक : कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर दाम्पत्याने विषसेवन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.टिळकवाडी येथील यशोकृपा बंगला येथे ही घटना घडली. या घटनेत जयेश रसिकलाल शहा (५८) व रक्षा जयेश शहा (५५) यांचा मृत्यू झाला आहे. दोघांनी विष का प्यायले याचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश व रक्षा शहा यांना रविवारी रात्री ११ च्या सुमारास गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शहा यांचा मोठा मुलगा बांधकाम व्यावसायिक असून, त्यास रात्री दहाच्या सुमारास रक्षा शहा यांनी फोन केला, मात्र त्या बोलताना अडथळल्या. त्यामुळे मोठ्या मुलाने रात्री घरी जाऊन पाहणी केली असता दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळूून आले. त्यांना सुरुवातीस खासगी व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोघांना रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सरकारवाडा पोलिसांनी शहा दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. संशयास्पद कोणतीही वस्तू किंवा आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी केली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विवाह सोहळ्यापूर्वीच ‘एक्जिट’
शहा दाम्पत्यांना दोन मुले असून, मोठा मुलगा बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात असून, लहान मुलाचा जानेवारी महिन्यात विवाह नियोजित केला आहे. त्याच्या विवाहानिमित्त रविवारी शहा कुटुंबीयांनी कार्यक्रमाचे आयोजन करीत नातलगांसोबत जेवण केले. त्यानंतर मोठा मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेला, तर धाकटा देवदर्शनासाठी गेला होता. मोठा मुलगा घरी आल्यानंतर त्यास आईवडील बेशुद्ध आढळले. नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात आनंदी वातावरण असल्याने शहा दाम्पत्याने अचानक ‘एक्जिट’ का घेतली हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.