नाशिक:- गुजरातहुन मोटारसायकलवर घरी येत असताना वाटेतच मांजाने गळा चिरल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली पाथर्डी परिसरात घडली आहे. सोनू किसन धोत्रे (वय २३) अस मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.मृत सोनू धोत्रे याचे मे महिन्यात लग्न होणार होते. गुजरातवरून बहिणीला भेटण्यासाठी घरी जात असताना पाथर्डी येथे ही घटना घडली आहे. आपल्या बहिणीची भेट अपूर्ण राहिली आहे. सोनू याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत
दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी मांजामुळे गळे कापल्याच्या घटना घडत आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोटमगाव येथे झालेल्या घटनेत देवराज कोटमे या 5 वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन 14 टाके पडले आहेत, तर पिंपळखुटे येथील शुभम पवार यांना देखील गळ्याला नायलॉन मांजामुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत. तर तिसऱ्या घटनेत अंदरसुल येथील दीपक राऊत या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून जखम झाल्याने त्यालाही 20 टाके पडले आहेत. प्रशासनाने आवाहन करूनही नायलॉन मांजा सर्रास वापरला जात असून रोजचं नायलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. परिणामी या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करूनही छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहे. अशातच आता नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर संक्रात येणार आहे. कारण नायलॉन मांजाने पतंग उडविणारे मुलं, पालक आणि विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांकडून ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ करण्याचा गुन्हा दाखल होणार आहे.
दरम्यान गुजरात येथे नगरपालिकेत कंत्राटी वाहचालक म्हणून सोनू नोकरी करत होता. त्याचा मे महिन्यात विवाह होणार होता. सोनू गुजरात येथून स्वतःच्या दुचाकीने संक्रांतीनिमित्त त्याच्या आईला व होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी नाशिकला येत असताना ही दुर्घटना घडली. तो कुटुंबाला भेटण्यापूर्वी मृत्यमुखी पडला. चारणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार, पवन परदेशी, कुलदीप पवार, अमोल कोथमीरे, जय लाल राठोड आदींनी त्यास रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात हळविले. त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.