पाचोरा जवळ बोगीला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी चालू रेल्वेतून मारल्या उड्या समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून अकरा जणांचा मृत्यू

Spread the love

जळगाव :- पुष्पक रेल्वेत आग लागल्याच्या अफवेमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. परधाडे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस आल्यानंतर गाडीत अचानक आग लागल्याची अफवा पसरली. यानंतर प्रवाशांना आरडाओरड सुरू केली, तर काही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या घेतल्या.
या घटनेत विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनखाली चिरडून काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तसेच 5 ते 6 लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसचा अचानक ब्रेक लागल्याने रुळावर आगीड्या ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या पाहिलेल्या प्रवाशांना गाडीला आग लागली असे वाटले. यामुळे घाबरलेल्या प्रवाशांना आरडाओरड सुरू केला. या दरम्यान काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वे थांबवली आणि खाली उड्या मारल्या. परंतु त्याच वेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसखाली चिरडून 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 5 ते 6 प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका आणि बचाव पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक पोलिस देखील घटनास्थळी बचावकार्यास मदत करण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालायत दाखल कऱण्यात आले आहे अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. तसेच घटनास्थळाहून दोन्ही ट्रेन रवाना झाल्याची माहिती देखील मिळाली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी काय सांगितले…?

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेस लखनऊहून मुंबईकडे येत होती. परंतु परधाडे स्थानकाजवळ अचानक ब्रेक लागल्याने ट्रेन थांबली. यावेळी काही प्रवासी रुळावर उतरले. तेवढ्यात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने काही प्रवाशांना धडक दिली. मध्य रेल्वेचे सीपीआरओ डॉ. स्वानील यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये ‘एसीपी’ म्हणजेच अलार्म चेन पुलिंग झाले होते. चेन पुलिंग का झाले याची माहिती अद्याप रेल्वेकडे नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर ट्वीट केले आहे. “जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

काय म्हणाले जिल्हाधिकारी?

या अपघातात सहा ते आठ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं जळगावचे जिल्हाधिकारी म्हणाले. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी बचाव पथक पोहोचल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

काय म्हणाल्या खासदार स्मिता वाघ?

या अपघातासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मदत कार्य लवकरात लवकर पोहोचवण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत असं जळगावच्या खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी या अपघातासंदर्भात माहिती दिली. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं त्यांनी सांगितलं. या अपघातात नेमके किती मृत्यू झाले हे निश्चित सांगता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.”

मुख्य संपादक संजय चौधरी