परभणी :- तिन्ही मुली झाल्यामुळे पतीकडून नेहमीच शिवीगाळ, मारहाण करीत पत्नीशी भांडणे व्हायची. यातच गुरुवारी रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडलिक काळे (३०) हिस पेट्रोल टाकून पेटवून दिले.घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारास दाखल केले असता मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शहरातील गंगाखेड रोड अनुसया टॉकीजसमोर राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये घडली. याप्रकरणी कोतवाली ठाण्यात मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून मृत महिलेच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मैना कुंडलिक काळे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे, तर कुंडलिक उत्तम काळे (३२) असे आरोपी पतीचे नाव आहे. मृत महिलेची बहीण भाग्यश्री काळे (रा. गंगाखेड नाका) यांनी कोतवाली ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी भाग्यश्री आणि मैना काळे या दोघी सख्ख्या बहिणी असून, मैना काळे हिला नंदिनी (सहा), काजल (चार) आणि सोनी काळे (एक वर्ष) अशा तीन मुली आहेत. फिर्यादी आणि मृत या शेजारीच राहतात. मैना हिचा नवरा कुंडलिक हा मैना हिला तिन्ही मुली झाल्यामुळे दररोज शिवीगाळ करून मारहाण तसेच भांडण करीत असे.
हे भांडण अनेकदा फिर्यादी बहिणीने सोडविले. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मैना काळे ही ओरडत घराबाहेरील रस्त्यावर आल्याने फिर्यादी यांनी घराबाहेर येऊन पहिले. त्यावेळी आगीने पेटलेल्या अवस्थेत मैना एका दुकानामध्ये शिरल्या व मला वाचवा म्हणून पळत होत्या. यानंतर पती कुंडलिक काळे हा तेथून पळून जाताना दिसून आला. गंभीर जखमी मैना यांना त्वरित सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास डॉक्टरांनी मैना यांना तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर कोतवाली ठाण्यात भाग्यश्री काळे यांनी फिर्याद दिली. मृत महिलेचा पती कुंडलिक काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस २०२३ कलम १०३ (१) अन्वये जाळून ठार मारल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा रुग्णालय, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक संजय ननावरे, उपनिरीक्षक धोत्रे, अंमलदार जंगम, मोहम्मद गौस, मुरकुटे, ताटीकुंडलवार यांनी भेट दिली. आरोपी कुंडलिक काळे यास पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब धोत्रे करीत आहेत.
अन् दुकानाला लागली आग
उड्डाणपूल परिसरात गंगाखेड नाकाशेजारी दुकाने आणि संबंधित मृत महिलेचे कुटुंबीय राहत असलेले पत्राचे शेड बाजूबाजूला आहे. या पत्राच्या शेडमध्ये घरात महिलेला पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार रात्री समोर आला. सदरील महिला घराबाहेर आली व स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आजूबाजूला पळत होती. त्याचवेळी महिला एका दुकानाजवळ गेल्याने दोन दुकानांना आग लागली. त्यात दुकानातील साहित्य जळाले व महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे प्र. अग्निशमन अधिकारी डी. यू. राठोड यांच्यासह पथकाने आग लागल्याची माहिती मिळताच धाव घेत रात्री एक तासात आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेतील महिलेचा दुर्दैवी अंत झाला.